अहंकाराविरोधातल्या रणसंग्रामात निंबाळकरांच्याच विजयाचे पारडे उत्तम – राहुल मदने

माढा मतदारसंघ महाराष्ट्रभर गाजला प्रचंड प्रमाणात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे भाजपाच्या फांदीवर बसून राष्ट्रवादीच्या कैरीवर डोळा ठेवलेल्या संजयमामा शिंदेना उमेदवारी तर भेटली पण उमेदवारीचा गळ्यातला हार सुकायच्या आतच सहकारमंत्री पुत्राने मामाचा उल्लेख “बळीचा बकरा” म्हणून केला. आणि राष्ट्रवादीच्या समोर ठाकलेल्या आव्हानाचा इशाराच जणू जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांना मिळाला.
२०१४ च्या मोदीलाटेत भल्याभल्याचं पानिपत झालं मात्र विजयसिंह मोहिते पाटलांनी संघटन कौशल्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या जोरावर माढा मतदारसंघात आपलं असलेलं वलय दाखवून दिलं.रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजकीय पटलावरचा अनुभव दांडगा पण आघाडीच्या नकारात्मक राजकारणापेक्षा मोदी-फडणवीस जोडगोळीच्या विकासाभिमुख वाटचालीचे त्यांना आकर्षण वाटले आणि घुसमटीचे कारण न देता जिल्ह्याचा पाणीप्रश्न आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगून ते हातातील घड्याळ काढून भाजपवाशी बनले.
भाजपच्या गोळाबेरजेतून जिल्हा परिषद अध्यक्ष बनलेल्या संजयमामाच्या अवसानघातकी निर्णयाने मतदारांच्या मनातून ते वजा झालेत असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
रांगडेपण जपणाऱ्या या नेत्याने आपल्या अनुयायांनाच ‘मामा’ बनविल्याने हा मुखवटेधारी चेहरा त्यांना नकोसा वाटायला लागला.
कारण मामाच्या आत्मविश्वासावर उर्मटपणाची झालर असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले होते.माळशिरस परगण्यातून उत्तमराव जाणकर आणि मोहीते पाटील गटाची कुमक जोडीला अकलुजकरांचे करमाळ्याच्या नारायण आबा पाटलांशी असलेले सख्य विचारात घेऊन भाजपने ‘सुंठेवाचून खोकला गेला’ म्हणत उमेदवारीची माळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गळ्यात घातली आणि सभ्य चेहरा भाजपचा उमेदवार म्हणून जनमानसासमोर आला.
निंबाळकरांनी हार-तुरे सत्कार फेट्यापेक्षा जनमानसावर आपली स्वच्छ-सभ्य प्रतिमा ठसवण्यावर भर दिला.त्यामुळे एकप्रकारे ही लढाई अहंकाराविरधातली असल्याचे आणि या रणसंग्रामात निंबाळकरांचा विजय होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुजरात विकासाचे कधीकाळी गोडवे गाणारे देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय होताच भांबावून गेले.
हा उदय अनेकांच्या महत्त्वाकांक्षेचे पंख छाटणारा ठरला परिणामी अभद्र गठबंधन जन्माला येऊन ही निवडणूक पुन्हा एकदा मोदीकेंद्रीत होण्याच्या दिशेने पाऊले टाकतेय.राष्ट्रीय राजकारणाचा विचार करताना स्थानिक रुसवेफुगवे बाजूला ठेवायचे असतात आणि ते ठेवण्यात जुन्याजाणत्यांची पक्की मोळी बांधून विजयाचा पक्का निर्धार करुन चंद्रकांत दादा पाटलांनीही माढा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनवल्याने नाईक निंबाळकरांचे पारडे जड ठरत आहे.तर दुसरीकडे माण-खटाव मधील आघाडीतली बिघाडी आणि सांगोल्यातील ‘केसगळतीच्या’ धमकीने आघाडीतच गळती लागल्याने राजाचं जाणतेपण निष्प्रभ ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पिलीव जिल्हा परिषद गणातून मताच्या फोडाफोडीचे राजकारण करण्यासाठी ‘मामाकडून बोळवण’ केली गेली असली तरी जनता असल्या भाडोत्री बाहुलीचा शिक्का पडलेल्यांना भूलण्याची सुतराम शक्यता नाही. विकासाच्या राजकारणापेक्षा मोहीते पाटलांना शह देण्यासाठी ‘राजकीय क्षितिजावरुन मावळण्याची तयारी,हीच का आधुनिक संजयची दुरदृष्टी ? ‘ असा प्रश्न सामान्य मतदारांकडून विचारला जातोय.
जानकर-मोहीते पाटलांची मजबूत गढी लुंग्यासुंग्याच्या धडकेने ठासळेल इतकी लेचीपेची नाही हे मतदारसंघातील जनतेलाही ठाऊक आहे.प्रचंड कार्यकर्त्यांच्या प्रेमाची अस्मिता बनलेल्या गढीला धडका देणारांचा कपाळमोक्ष मात्र ठरलेला आहे.
गेली पंचवीस वर्षे असंख्य संकटाचा सामना करत सामाजिक कार्यात निष्कलंकपणे वावरणाऱ्या उत्तमराव जाणकरांची गरुडभरारी “संघर्षयात्री” बिरुदावलीला साजेशी अशीच राहिली आहे.
“एकटाच नाही मी युगाचीही साथ आहे,सावध असा ही तुफानाची सुरुवात आहे.”
या ओळीला साजेसा उत्तमराव जाणकरांचा वाढता जनाधार विरोधकांसाठी धडकी भरवणारा असल्याने आगामी लढाईत त्यांचा शब्द प्रमाण ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ते गौतम बुद्ध यांच्या विचारांचे पारायण करुन वैयक्तिक जीवनात तत्वांशी इमान राखणारा लढवय्या नेता म्हणून त्यांचे गारुड जनमनावर अधिराज्य गाजवतंय.
कोणाला कितीही फोडाफोडीच्या राजकारणाचे डोहाळे लागले तरी
जानकरांप्रती निष्ठा असलेला मतदार त्यांच्या मायेच्या सावलीत विसावलेला आहे.
धनगर समाजाला सवतीची वागणूक देणे असो की राज्याच्या राजकारणात रमलेल्या महादेवराव जाणकरांना पावलोपावली पाण्यात पाहणे असो यामुळे धनगर समाजाचा प्रभाव असणाऱ्या माळशिरस मतदारसंघात या समाजाचे राष्ट्रवादीच्या विरोधात ध्रुवीकरण झाले आहे.
जानकर-मोहीते पाटील राजकीय मतभेद संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार सर्वपरिचित आहे.
त्यामुळे या दोन ताकदवान नेत्यांमध्ये झालेल्या मनोमिलनाचा फायदा आगामी विधानसभेतही पहायला मिळेल.
मोहीते पाटलांना मानणारे आणि उत्तमराव जाणकर गटाचे नेते कार्यकर्ते यांच्यातील संभ्रम संपुष्टात आणून माळशिरस विधानसभा पर्यायाने माढा मतदारसंघातील मतदार विजयाचा हार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या गळ्यात घालून मोदींच्या ‘नेशन फर्स्ट’ अभियानाला बळकटी देतील हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *