शेटफळ घटनेचा रिपब्लिकन सेनेकडून तीव्र निषेध,सर्व आरोपींना तातडीने अटक करा ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

पिलीव/सुजित सातपुते

सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथे मागासवर्गीय समाज बांधवांवर झालेला हल्ला, घरांची तोडफोड आणि नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेल्या धोक्याच्या घटनेचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. घटनेतील एकही संबंधित आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये, अशी ठाम भूमिका रिपब्लिकन सेनेने घेतली आहे.

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ भोसले यांनी शेटफळ गावाला भेट देऊन पीडित समाजबांधवांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेत पीडितांना धीर देत, “रिपब्लिकन सेना आपल्या सोबत आहे,” असा विश्वास दिला.

या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी घटनेत सहभागी असलेल्या इतर सर्व संबंधित आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करावी आणि उपलब्ध कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोमनाथ भोसले यांनी केली.

तसेच, तडीपार असलेला कोणताही आरोपी गावात वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास, तडीपार आदेश असतानाही तो गावात कोणाच्या आश्रयाने किंवा संरक्षणाखाली राहत होता का, त्याला कोणाचे पाठबळ होते का, याचीही निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. चौकशीत दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका रिपब्लिकन सेनेने स्पष्ट केली.

याबाबत डी.वाय.एस.पी. यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सर्व संबंधित आरोपींना तातडीने अटक, पीडितांना आवश्यक पोलीस संरक्षण आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सोमनाथ भोसले यांनी दिला.

या घटनेची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर तसेच राष्ट्रीय युवा नेते ॲड. अमन आंबेडकर यांना देण्यात आली असून, ते सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी माढा लोकसभा जिल्हाध्यक्ष विश्वास उगाडे, माळशिरस तालुका अध्यक्ष विकी लोंढे, युवक तालुका अध्यक्ष शिवाजी खडतरे, रवी कोळी यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

“पीडितांना न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” अशी भूमिका यावेळी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमनाथ भोसले यांनी व्यक्त केली,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *