महिला आरोग्याची ढाल”डॉ.श्रद्धा जवंजाळ” !
पिलीव/सुजित सातपुते
समाजात अशा मोजक्याच व्यक्ती असतात ज्यांचे कार्य केवळ शब्दांत व्यक्त न होता त्यांच्या कृतीतून समाजजीवनाला एक नवी दिशा देते. आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सबलीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ घालून देणारे असेच एक अखंड सोलापूर जिल्ह्यातील प्रभावशाली नाव म्हणजे अकलूज येथील डॉ.श्रद्धा राहुल जवंजाळ. ‘पिंक रिव्होल्युशन’ (Pink Revolution) या सामाजिक चळवळीच्या संस्थापक असलेल्या डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी कर्करोगाच्या संकटाशी लढा देण्यापासून ते वंचित घटकांच्या विकासापर्यंत बहुआयामी योगदान दिले आहे,
महिला आरोग्याची ढाल,गर्भाशयाच्या कर्करोगाविरुद्ध महाअभियान
महिला आरोग्याबाबत समाजात जनजागृती घडवून आणणे हा डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या कार्याचा मुख्य केंद्रबिंदू राहिला आहे. गेल्या १३ वर्षांहून अधिक काळापासून त्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर (Cervical Cancer) प्रभावी जनजागृती मोहिमा राबवत आहेत, एचपीव्ही (HPV) लसीकरण: शाळा, महाविद्यालये आणि आरोग्य शिबरांच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिला व तरुणींना या गंभीर आजाराविषयी सोप्या भाषेत माहिती दिली. केवळ प्रबोधन करून न थांबता, त्यांनी हजारो गरजू मुलींना सुमारे ४,००० रुपये किमतीची कर्करोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून दिली आहे.
अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये ९ ते २० वयोगटातील ३५० हून अधिक कुमारिकांना सुमारे १५ लाख रुपयांचे मोफत लसीकरण करण्यात आले. कॅन्सर पेटंट एड असोसिएशन इंडिया व पिंक रिव्होल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात सहभाग नोंदवत त्यांनी महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी मोठे पाऊल उचलले आहेत,
‘पिंक रिव्होल्युशन’ चळवळ आणि व्यापक सामाजिक योगदान
“सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या विचाराने प्रेरित होऊन डॉ. जवंजाळ यांनी ‘पिंक रिव्होल्युशन’ची स्थापना केली. या चळवळीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशात आरोग्याची आणि सामाजिक प्रबोधनाची मशाल पेटवली जात आहे.
शैक्षणिक दीपस्तंभ (‘हॅपी स्कूल’ उपक्रम): २०११ पासून माळशिरस तालुक्यात ‘हॅपी स्कूल’ योजनेअंतर्गत सरकारी शाळांमध्ये बेंच, डिजिटल/स्मार्ट किट, शालेय व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. ‘गुड टच – बॅड टच’ अभियानाद्वारे बालसुरक्षेचे धडे देण्याबरोबरच ‘लिटरेसी ड्राईव्ह’द्वारे अशिक्षित पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले,
पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत त्यांनी वृक्षारोपण तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवले. पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्टील बॉटल आणि कापडी पिशव्यांचे वाटप करून ‘स्वच्छता आणि पर्यावरण जपा’ असा वेळोवेळी संदेश दिला आहे,
कोविड काळातील अतुलनीय काम म्हणजे
कोविड-१९ च्या महामामारीत जेव्हा आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता, तेव्हा डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या एन.जी.ओ. ‘नर्सिंग ब्यूरो’च्या माध्यमातून अनेक शहरांमध्ये परिचारिकांची (Nurses) उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली होती,अकलूज येथील कोविड सेंटरसाठी त्यांनी पहिली लाट संपेपर्यंत परिचारिकांची टीम मोफत पुरवली. तसेच अन्नधान्य, कपडे, बिस्किटे आणि पाणी वाटप करून गरजूंना मोठा आधार दिला होता,
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान
वयाच्या २० व्या वर्षापासून सुरू केलेला हा सेवाभाव आज आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला जात आहे.
त्या आंतरराष्ट्रीय ब्यूटी स्पर्धांमध्ये परीक्षक (Judge) म्हणून कार्यरत राहिल्या आहेत.
उत्कृष्ट शिक्षकांसाठी ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन इतरांना प्रेरित करणे, तसेच विविध राष्ट्रीय व जागतिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना (International Human Rights Ambassador Organization) द्वारे आयोजित कार्यक्रमांत त्यांची प्रमुख उपस्थिती आणि नेतृत्व उल्लेखनीय ठरले आहे, प्रेरणादायी नेतृत्व कर्करोगासारख्या गंभीर आजाराविरुद्ध उभी केलेली मजबूत भिंत,गरजूंच्या शिक्षणाची दिलेली साथ आणि महिलांच्या आरोग्यासाठी घेतलेले व्रत यांमुळे डॉ. श्रद्धा जवंजाळ यांचे कार्य प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.’गजर नारी शक्तीचा’ या सदराच्या माध्यमातून डॉ.श्रद्धा जवंजाळ यांच्या या ऐतिहासिक अशा सामाजिक कार्याला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सलाम !