रायगड विकास प्राधिकरणच्या सोशल मीडिया सेल वर ओंकार आडत यांची निवड…!
पिलीव अपडेट/वेळापूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे रायगड प्राधिकरणाची घोषणा केली होती.या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड करण्यात आली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्याची विकास कामे हाती घेऊन ही कामे मोठ्या प्रगतीपथावर सुरू आहेत.या प्राधिकरणाच्या सोशल मीडिया सेल वरती वेळापूर ता.माळशिरस येथील तरुण पत्रकार ओंकार दत्तात्रय आडत यांची सोलापूर जिल्ह्यातून निवड करण्यात आली असून रायगड विकास प्राधिकरण ची कामे सोशल मिडियाद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांचेवर सोपविण्यात आले आहे.
खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. राज्य आणि देशभरातील शिवभक्त दरवर्षी रायगडावर जातात. रायगडासह शिवकालीन गडकोटांच्या संवर्धनासाठी राज्यसरकारने भरीव निधी मिळावा, अशी मागणी दरवर्षी केली जात होती. २०१६ मध्ये रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगड व परिसर संवर्धनासाठी ६०० कोटी रुपये निधीची घोषणा केली होती. खासदार संभाजीराजे यांच्याकडून रायगड किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रायगडाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा व भुदरगड किल्ल्यांसाठी १० कोटीचा विशेष निधी मंजूर करून आणला व त्याचे संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. युनेस्को या जागतिक वारसा जतन व संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूरात आमंत्रित करून महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभेतही त्यांनी शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश जागतिक वारसा यादीत व्हावा, अशी मागणी केली आहे. पाच जून २०१७ रोजी राजगडाचे संवर्धन करण्यासाठी तज्ज्ञ, अभ्यासकांचा परिसंवाद आयोजित करुन चर्चा केली होती. रायगड प्राधिकरण योजनेत सिंधुदूर्ग किल्लाचा समावेश करण्यात आला आहे.
प्राधिकरणाच्या समितीत रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण आयुक्त जगदीश पाटील, पर्यावरण व सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव नितीन गद्रे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, एएसआय रिजनल जनरल डॉ. एम. नंबीराजन, डायरेक्टर जनरल डॉ. उषा शर्मा, एमटीडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर विजय वाघमारे, रायगड जि. प. सीईओ अभय यावलकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, रघूजी आंग्रे, इतिहास अभ्यासक राम यादव, सुधीर थोरात आदींचा सामावेश आहे.
चौकट : प्रामाणिक पणे जबाबदारी पार पाडणार !
खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिक पणे व निस्वार्थी भावनेने पार पाडणार असून रायगड विकास प्राधिकरण ची कामे जनतेपर्यंत पोहचविणे व गडकोट संवर्धन बाबत जनजागृती करण्यासाठी प्राधान्य देणार आहे. :
#ओंकार आडत,पत्रकार