६७व्या वर्षीही पिलीव येथील “बाबुराव डोळस” जपताहेत लुप्त होत चाललेली सुतारकला !

पिलीव | सुजित सातपुते

डिजिटल युगात यंत्रांनी माणसाच्या हातातील पारंपरिक कौशल्याची जागा घेतली असताना, पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली एखादी कला आपल्या हातांनी जिवंत ठेवण्याचे काम करणारे कलाकार आजही समाजात आहेत.अशाच एका अवलिया कारागिराचे नाव म्हणजे बाबुराव रामचंद्र डोळस(सुतार)रा.पिलीव ता.माळशिरस,जि.सोलापूर यांची वयाची ६७ वर्षे पूर्ण झाली असली तरी हातातील कौशल्याची धार आजही तितकीच कायम आहे.

बाबुराव डोळस यांचे वडील रामचंद्र डोळस हेदेखील सुतारकाम करत होते. वडिलांकडून वारशाने मिळालेली ही कला बाबुरावांनी केवळ व्यवसाय म्हणून स्वीकारली नाही, तर ती आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवली. परिसरात ते प्रेमाने ‘दादा’ म्हणून परिचित आहेत.

विशेष म्हणजे, कोणत्याही आधुनिक मशीनचा वापर न करता केवळ आपल्या हातातील अवजारांच्या मदतीने सागवानाच्या लाकडापासून आकर्षक आणि कलाकुसरीने सजवलेल्या बैलगाड्या तयार करण्याचे त्यांचे कौशल्य पाहण्यासारखे आहे. लाकडाचा प्रत्येक तुकडा जणू त्यांच्या हातात आकार घेऊन कलाकृती बनतो.

त्यांनी तयार केलेल्या बैलगाड्या लहान मुलांच्या खेळण्यांसाठी, मोठमोठ्या हॉटेल्स, मॉल्स, मंदिरांमध्ये शोपीस म्हणून तसेच आपल्या घराची शोभा वाढविण्यासाठी हौशी ग्राहकांकडून आवडीने खरेदी केल्या जातात. त्यांच्या हातून साकारलेल्या अनेक बैलगाड्या आज विविध ठिकाणी शोभेची वस्तू म्हणून दिमाखात उभ्या आहेत.

बैलगाडी तयार करताना ते प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देतात. बैलांच्या प्रतिकृती, पितळेचे बारीक साहित्य, दोऱ्या, चाकांची रचना आणि लाकडावरील कोरीव काम अशा प्रत्येक बाबीत त्यांची कलात्मक नजर दिसून येते. त्यामुळे त्यांनी तयार केलेली प्रत्येक बैलगाडी ही दुसऱ्यापेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते.

त्यांच्या मेटावर सुतारकाम सुरू असताना ही कलाकुसर पाहण्यासाठी हौशी नागरिकांची गर्दी होत असते. त्यांच्या हातातील पट्टाशी-हातोड्याचा आवाज आणि लाकडातून हळूहळू आकाराला येणारी बैलगाडी पाहणे, हा अनेकांसाठी कुतूहलाचा आणि आनंदाचा विषय ठरतो.

“कलेला किंमत नसते; कलाकाराच्या हातातील कलेला मान असतो,” याचा प्रत्यय बाबुराव डोळस यांच्या कामातून येतो. त्यांच्या कलाकृतीची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून ग्राहकही त्यांच्या बैलगाडीची किंमत ठरवताना केवळ लाकूड आणि मेहनत न पाहता त्यामागची कला आणि कलाकाराचा अनुभव याला महत्त्व देतात.

आजच्या काळात तयार वस्तू, आधुनिक मशीन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे हाताने वस्तू बनविण्याची परंपरा झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत बाबुराव डोळस यांच्यासारखी व्यक्ती आपल्या वडिलांकडून मिळालेला कलेचा वारसा पुढे नेत आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.

कदाचित बाबुराव डोळस ही हाताने पारंपरिक पद्धतीने बैलगाडी बनविणाऱ्या शेवटच्या पिढ्यांपैकी एक पिढी ठरू शकते. त्यांच्या हातातील ही कला पुढील पिढीपर्यंत पोहोचली नाही, तर अशा अनेक पारंपरिक कला इतिहासाच्या पानांमध्येच बंदिस्त होतील.

म्हणूनच बाबुराव डोळस यांच्या हातातील पट्टाशी -हातोडा केवळ लाकूड कोरत नाही, तो आपल्या मातीतली परंपरा, वडिलांचा वारसा आणि ग्रामीण संस्कृतीच्या आठवणींना आकार देत आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *