माळशिरस पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार विशाल नवले यांच्याकडे : ‘सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन’ या भूमिकेतून काम करणार; गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट इशारा

पिलीव/सुजित सातपुते

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) विशाल नवले यांनी माळशिरस पोलीस ठाण्याचा प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विशाल नवले म्हणाले, “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला अनुसरून सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतो. त्याच भूमिकेतून माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपणही काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आपल्या वर्तनात बदल घडवून आणावा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नवले यांनी केले. “कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

माळशिरस शहरासह ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याबरोबरच गुन्हेगारीला आळा घालणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि कायद्याचा धाक निर्माण करणे, यावर नवले यांच्या कार्यकाळात विशेष भर राहणार असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *