पिलीवमध्ये राखी खरेदीसाठी गर्दी : बाजारपेठेला सणाचा रंग !

पिलीव/ सुजित सातपुते

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील पिलीव गावातील बाजारपेठेत सणाची लगबग सुरू झाली आहे. बस स्थानक परिसर तसेच मुख्य पेठेतील विविध ठिकाणी राखी विक्रीचे स्टॉल थाटण्यात आले असून, राखी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

राखी पौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील भावनिक आणि कौटुंबिक महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुख, समृद्धी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाची आणि तिच्या सुख-दुःखात सदैव साथ देण्याची भावना व्यक्त करतो. त्यामुळे या सणाला केवळ धार्मिक नव्हे, तर भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकी दृढ करणारा सण म्हणून विशेष महत्त्व आहे.

पिलीवमध्ये सध्या विविध आकर्षक रंग, डिझाईन आणि आकारातील राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक राख्यांबरोबरच लहान मुलांसाठी आकर्षक कार्टून, फॅन्सी तसेच विविध प्रकारच्या राख्यांना विशेष मागणी असल्याचे चित्र आहे. बस स्थानक परिसर आणि मुख्य पेठेत ठिकठिकाणी उभारलेल्या स्टॉलमुळे बाजारपेठेला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

राखी खरेदीसाठी महिला, लहान मुले तसेच कुटुंबीयांची मोठी वर्दळ वाढली असून, आगामी राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत वाढलेली ही गर्दी पिलीवच्या व्यापारी हालचालींना देखील चालना देणारी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *