भक्ती-संगीताची अनोखी वारी : श्री.अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ‘सुरसंगीताच्या’अविस्मरणीय सोहाळ्याचे आयोजन !

पिलीव/सुजित सातपुते

आषाढी वारीच्या भक्तिमय परंपरेला संगीताची सुरेल जोड देत ‘आषाढी वारी २०२६ – भक्तीताची वारी’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा.श्री.अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात भक्तिसंगीतासह विविध नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत होणार आहे.

अतुल कुलकर्णी हे केवळ सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजक म्हणून नव्हे, तर वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणारे सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी आजवर ज्या-ज्या ठिकाणी नोकरी केली, त्या प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कामाच्या व्यापातूनही सामाजिक बांधिलकी जपण्याची त्यांची ही भूमिका विशेष उल्लेखनीय ठरत आहे.

वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता त्यातून पर्यावरणाविषयी जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढला पाहिजे, या भावनेतून कुलकर्णी विविध सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याला सांस्कृतिक उपक्रमांची जोड मिळाल्याने समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचे काम होत आहे.

याच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘ संगीताची वारी’ या कार्यक्रमात कविता राम, वर्षा एखंडे, प्रतीक सोलसे आणि राज नारायण हे विशेष कलाकार सहभागी होणार आहेत.भक्तिमय वातावरणात संगीताचा आनंद घेण्याची संधी रसिकांना या कार्यक्रमातून मिळणार आहे.

या कार्यक्रमास कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मा.श्री.रंजन कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी आयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री.विजय कबाडे आणि श्रीमती प्रेरणा कट्टे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संगीत, संस्कृतीक आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवून आणणारा हा सोहळा रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. ‘भक्तीच्या वातावरणात अनुभूया सुरसंगीताचा अविस्मरणीय सोहळा’, या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *