सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी १५ ऑगस्टपासून “डॉ.कुमार लोंढे” यांचा आमरण उपोषणाचा इशारा

पिलीव/सुजित सातपुते

भारतीय राज्यघटनेतील सामाजिक न्याय, समता, प्रतिनिधित्व व आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी डॉ. कुमार लोंढे, नॅशनल प्रेसिडेंट, सेंट्रल ह्युमन राइट संघटन, दिल्ली यांनी शासनाला निवेदन दिले असून, मागण्यांवर योग्य कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनात SC/ST/OBC आरक्षणातील बॅकलॉग तातडीने भरून काढणे, आरक्षण व प्रतिनिधित्वाबाबत सामाजिक व शैक्षणिक आकडेवारी सार्वजनिक करणे, SC आरक्षण २३ टक्के करण्याबाबत प्रक्रिया सुरू करणे, ST व OBC आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित करण्याबाबत विचार करणे तसेच खासगी क्षेत्रातील आरक्षणाबाबत निर्णय घेणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

याशिवाय EWS आरक्षणाचा सर्वंकष पुनर्विचार, आरक्षण व्यवस्थेचा राष्ट्रीय स्तरावर अभ्यास, SC/ST/OBC समाजघटकांच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक विचार तसेच सामाजिक-आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रभावी धोरणांची मागणी करण्यात आली आहे.

“WE THE PEOPLE OF INDIA” या संविधानिक तत्त्वाच्या आधारे सामाजिक न्याय, समान संधी आणि वंचित घटकांना न्याय मिळावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. आंदोलन शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती भारताचे सरन्यायाधीश, राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत.

“जय संविधान, जय भारत” असा संदेश देत सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी डॉ. कुमार लोंढे यांनी केली आहे.यावेळी निवासी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देताना आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास धाईंजे,डॉ.कुमार लोंढे,विशाल साळवे व रणजीत सरवदे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *