मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाला यशाची सलामी : “स्वप्नील भंडलकरची” जलसंधारण अधिकारी या क्लास 2 च्या पदाला गवसणी !
पिलीव/सुजित सातपुते
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव आणि मनात जिद्द असेल तर यशाला गवसणी घालता येते, हे पिलीव येथील स्वप्नील शंकर भंडलकर याने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे. लोकांच्या शेतात मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या आई-वडिलांच्या संघर्षाला आपल्या यशाची सुंदर किनार देत स्वप्नीलने पहिल्याच प्रयत्नात जलसंधारण अधिकारी (गट -ब) मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन या पदाला गवसणी घालून आपल्या कुटुंबासह पिलीवच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत स्वप्नीलचे बालपण गेले.दोन वेळच्या उदरनिर्वाहासाठी आई-वडिलांनी लोकांच्या शेतात मोलमजुरी केली. स्वतःच्या सुख-दुःखाची पर्वा न करता त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. परिस्थितीने अनेकदा परीक्षा घेतली; मात्र स्वप्नीलने हार मानली नाही. आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करण्याची जिद्द मनात ठेवून त्याने अथक परिश्रम घेतले आणि पहिल्याच प्रयत्नात वर्ग-२ अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

स्वप्नीलच्या या यशाची बातमी समजताच पिलीवसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या यशाचा आनंद अविस्मरणीय करण्यासाठी स्वप्नीलची जिप्सीमधून पिलीवच्या मुख्य पेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मित्रपरिवारासह पिलीव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीदरम्यान गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईने संपूर्ण पिलीव परिसर आज दणाणून सोडला होता, आपल्या गावातील सामान्य कुटुंबातील मुलाने मिळवलेल्या या मोठ्या यशाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
विशेष म्हणजे, या यशामागे केवळ स्वप्नीलची मेहनत नाही, तर त्याच्या आई-वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टांचा मोठा वाटा आहे. ज्यांच्या हातावर कष्टाची घट्टे होती, त्याच हातांनी मुलाच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहिले; आणि आज त्या स्वप्नाला स्वप्नीलने आपल्या कर्तृत्वाने साकार केले. त्यामुळे स्वप्नीलचे यश हे केवळ एका तरुणाचे यश नसून संघर्ष करणाऱ्या प्रत्येक आई-वडिलांच्या आशेचा विजय आहे.
स्वप्नील भंडलकरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पिलीव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच भंडलकर परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘परिस्थिती गरीब असली तरी स्वप्ने श्रीमंत असावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असावी,’ याचा प्रेरणादायी संदेश स्वप्नीलच्या यशाने नव्या पिढीसमोर ठेवला आहे हे मात्र नक्की,