सुळेवाडी घाटात २४ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
पिलीव/सुजित सातपुते
बनपुरी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील व सध्या काळमवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे मामाच्या गावी वास्तव्यास असलेल्या महेश मारुती साळुंखे (वय २४) या युवकाने सुळेवाडी घाटातील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच पिलीव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माळशिरस येथे हलविला.
महेश साळुंखे हा मागील काही दिवसांपासून काळमवाडी येथे आपल्या मामाच्या गावी राहत होता. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे काळमवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेचा पुढील तपास पिलीव आऊट पोस्टचे हवालदार शंकर मरळे करीत आहेत.