पिलीवमध्ये भाजपला बळ : “कुमार लोखंडे” यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह मा.आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश !
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील दलित समाजाचे नेते म्हणून ओळख असलेले कुमार शंकर लोखंडे यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. कुमार लोखंडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे पिलीव परिसरात भाजपची नक्कीच संघटनात्मक ताकद वाढेल असे राम सातपुते यांनी उपस्थितांसमोर बोलून दाखविले,
कुमार लोखंडे हे यापूर्वी माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे समर्थक म्हणून कार्यरत होते. मात्र, आपल्या परिसरातील विकासकामे व नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत केलेल्या मागण्या अपेक्षेप्रमाणे मार्गी लागत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

“माजी आमदार राम सातपुते यांची सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची आणि कामे मार्गी लावण्याची पद्धत मला आवडली. गोरगरीब, वंचित आणि दलित समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करता यावे, या उद्देशाने मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे,” अशी भूमिका कुमार लोखंडे यांनी माळशिरस टाइम्सशी बोलताना व्यक्त केली.
पिलीवसह माळशिरस तालुक्यातील गोरगरीब, दलित व वंचित घटकांच्या विविध समस्या शासनदरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी आगामी काळात सक्रियपणे काम करण्याचा निर्धारही लोखंडे यांनी व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाकडे केवळ राजकीय प्रवेश म्हणून नव्हे, तर वंचित घटकांच्या प्रश्नांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याच्या भूमिकेचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.
यावेळी पिलीव जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य चंद्रकांत जाधव, माजी जि.प. सदस्य गणेश पाटील, माजी सरपंच नितीन मोहिते, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज उर्फ भाऊसाहेब पुकळे, भाजप नेते अंकुश भैस,पॅनल प्रमुख प्रमोद भैस, कुसमोडचे माजी उपसरपंच प्रा.संजय पाटील, कॉन्ट्रॅक्टर उमेशभाऊ सरवदे,ॲड.सत्यजित गलांडे, योगेश देशमुख,डॉ.निलेश कांबळे,फिरोज शेख तसेच अकलूजचे भाजप नेते किरण उर्फ बाबा गायकवाड,राहुल भैस, रामभाऊ गोरड, प्रा शिवाजीराव शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व लोखंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुमार लोखंडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पिलीव परिसरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली दलित व वंचित समाजाच्या प्रश्नांना कितपत राजकीय बळ मिळते,याकडे मात्र संपूर्णगावाचे लक्ष राहणार यात तीळ मात्र शंका नाही,