आज संत सावता माळी यांची पुण्यतिथी,आरण येथून आली ज्योत,पिलीव येथील समस्त माळी समाज व विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाचा उपक्रम; महाप्रसाद,कीर्तन व फुलांच्या कार्यक्रमाचे आयोजन !

पिलीव/सुजित सातपुते

भक्ती, समता, श्रमप्रतिष्ठा आणि विठ्ठलनामाचा संदेश देणारे थोर संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे समस्त माळी समाज व विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी महात्मा फुले नगर(काळामाळा)पिलीव येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

संत सावता माळी महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक थोर संत म्हणून ओळखले जातात. शेतीचे कष्टाचे काम करत असतानाच त्यांनी विठ्ठलभक्तीचा मार्ग स्वीकारला. ‘कर्म हीच पूजा आणि श्रम हाच धर्म’ असा जीवनमूल्यांचा संदेश त्यांच्या आचरणातून समाजाला मिळाला. संसार आणि प्रपंच सांभाळत परमेश्वराची भक्ती करता येते, हे त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले. त्यांच्या अभंगांमधून साधी, सरळ आणि अंतःकरणाला भिडणारी विठ्ठलभक्ती व्यक्त होते. “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” या त्यांच्या अभंगातील भावना श्रम करणाऱ्या सामान्य माणसाच्या जीवनातही ईश्वराचे अस्तित्व अनुभवण्याचा संदेश देतात.

पिलीव येथे आयोजित या पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात भक्तिभावाने करण्यात येणार असून, सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ९ ते १२ वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे, या वेळी ह.भ.प. सौ. पूनम ताई राजपूत, पिलीव यांचे प्रभावी कीर्तन होणार असून, संत सावता महाराजांच्या विचारांचा व भक्तिमार्गाचा जागर करण्यात येणार आहे. तसेच रात्री १२ वाजता फुलांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संत सावता महाराजांनी जात-पात, उच्च-नीचतेच्या भिंतींपलीकडे जाऊन नामस्मरण, कष्ट, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा मार्ग समाजाला दाखविला. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची संधी ठरणार आहे.

या भक्तिमय सोहळ्यास पिलीव परिसरातील तसेच माळशिरस तालुक्यातील भाविकांनी परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संत सावता महाराजांच्या नामघोषाने आणि विठ्ठलभक्तीने पिलीव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, भक्ती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देणारा हा सोहळा ठरणार असल्याचेही आयोजकांनी माळशिरस टाइम्सशी बोलताना सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *