आज पिलीव येथे सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांची तोफ धडाडणार !
पिलीव/ सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील युवा उद्योजक अविनाश तानाजी मदने-पाटील (उर्फ पप्पू शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त युवक-युवती व पालकांसाठी ऊर्जात्मक प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रेरणादायी कार्यक्रम आज गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.५० वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पिलीव येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रा. वसंत हंकारे (सांगली) हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीतून आणि अभ्यासपूर्ण विचारांतून हजारो युवकांना सकारात्मक दिशा देणारे प्रा. हंकारे हे लेखक, युवा प्रेरणादायी व्याख्याते, समाजपरिवर्तनासाठी कार्यरत विचारवंत तसेच राष्ट्रभूषण, भारतीय नवजवान व छत्रपती पुरस्काराने सन्मानित आहेत. विद्यार्थी, युवक आणि पालक यांच्यात व्यक्तिमत्त्व विकास, शिक्षण, करिअर, संस्कार, जीवनमूल्ये आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर ते प्रेरणादायी मार्गदर्शन करतात.
सिद्धिविनायक नवरात्र महोत्सव, पिलीव यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानाचा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.