पिलीव गावचे सुपुत्र तथा जतचे प्रांताधिकारी “अजयकुमार नष्टे” यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान !
पिलीव/सुजित सातपुते
महसूल दिनानिमित्त सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माळशिरस तालुक्यातील पिलीव गावचे सुपुत्र तथा जतचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) अजयकुमार कल्याण नष्टे यांचा उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली.
अजयकुमार नष्टे यांनी प्रशासनातील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे व लोकाभिमुख दृष्टीकोनातून पार पाडत महसूल विभागात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत महसूल दिनानिमित्त त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याबाबत माध्यमांशी बोलताना अजयकुमार नष्टे यांचे वडील तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कल्याण नष्टे यांनी सांगितले की, “शिक्षक म्हणून मुलांवर चांगले संस्कार करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. अजयकुमार यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थ भावनेने काम करत हा सन्मान मिळविला आहे. हा गौरव म्हणजे त्यांच्या प्रामाणिक आणि लोकहितवादी कार्याची पोहोचपावती आहे.”
या सन्मानाबद्दल पिलीव गावासह परिसरामध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून अजयकुमार नष्टे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.