बँक खाते व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने पिलीव येथील नाथाजी पवार यांची ८० हजारांची ऑनलाइन फसवणूक

पिलीव/सुजित सातपुते

बँक खाते व्हेरिफिकेशन करण्याच्या बहाण्याने ऑनलाइन भामट्यांनी कुसमोड (ता. माळशिरस) येथील नाथाजी मोतीराम पवार यांची तब्बल ८० हजार ८९० रुपयांची सायबर फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पवार यांनी माळशिरस पोलीस ठाणे, सायबर सेल तसेच बँक ऑफ इंडिया, पिलीव शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

नाथाजी पवार यांचे पिलीव येथील बँक ऑफ इंडिया शाखेत खाते आहे. १० ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सॲपवर बँक ऑफ इंडियाच्या लोगोचा वापर केलेला संदेश आला. त्यामध्ये ‘Bank of India Account Verification’ असा मजकूर होता. खात्याबाबत काही अडचण निर्माण झाली असल्याची भीती निर्माण झाल्याने पवार यांनी संबंधित संदेशावर विश्वास ठेवला.

याचाच गैरफायदा घेत भामट्यांनी पवार यांच्याकडून बँकेशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच एटीएमचा गुप्त पिन क्रमांक मिळवला. ही माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने रक्कम काढण्यात आली.

अशी काढली रक्कम :

  • २५,००० रुपये – पहिला टप्पा
  • २५,००० रुपये – दुसरा टप्पा
  • ५,००० रुपये – दोन वेळा
  • ९,९०० रुपये
  • १०,००० रुपये
  • ९०० रुपये – शेवटचा टप्पा

अशा प्रकारे एकूण ८०,८९० रुपये खात्यातून परस्पर वळविण्यात आले. घटना लक्षात आल्यानंतर पवार यांनी तातडीने संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सावधान! बँक कधीही पिन, ओटीपी मागत नाही,
सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकांनी अज्ञात क्रमांकावरून आलेल्या संशयास्पद लिंक, संदेश किंवा फोनवर विश्वास ठेवू नये. बँक अधिकारी फोन किंवा व्हॉट्सॲपवरून एटीएम पिन, पासवर्ड, ओटीपी किंवा फोनपे/गुगल पेची गोपनीय माहिती मागत नाहीत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीस वैयक्तिक अथवा बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नये. संशयास्पद व्यवहार झाल्यास तातडीने बँक व सायबर गुन्हे विभागाशी संपर्क साधावा, #ज्ञानेश्वर बोडरे,कॅशियर
बँक ऑफ इंडिया,पिलीव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *