माळशिरस पोलिसांची दमदार कामगिरी,दोन आरोपी ताब्यात तर १००% रिकव्हरी !
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी सुमारे ७० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयंतकुमार शिवदास पाटील (वय ६३, रा.बचेरी , ता. माळशिरस, जि. सोलापूर यांनी त्यांच्या घरासमोरील कारमध्ये ठेवलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच चांदीचे पैंजण, जोडवी व बिचवे असा एकूण अंदाजे ७० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने लबाडीने चोरून नेल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वंदना साळुंखे उर्फ वंदना पंडित रसाळे (वय ४५, रा. अकोला, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि शंकर जगन्नाथ राक्षे (वय ५६, रा. तासगाव, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल १००% हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. स्वरूपचंद शिंदे, पोकॉ. मन्सूर नदाफ आणि मपोकॉ. जयश्री साळुंखे यांनी केली. पुढील तपास स्वरूपचंद शिंदे हे करीत आहेत.