पिलीवचे भिम सैनिक भिमा कोरेगावला रवाना…!
पिलीव/सुजित सातपुते
भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील 100 भिम सैनिक रवाना झाले आहेत.गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली असून छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन कॕमेरे यांच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवली जाणार आहे.पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जातात.गेल्या वर्षी अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने हिंसाचार झाला होता.या पार्श्वभूमीवर यंदा भिमा कोरेगाव येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पाच हजार पोलीस कर्मचारी, बारा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, घातपात विरोधी सात चमू, बाराशे होमगार्ड, दोन हजार स्वयंसेवक, आठ सहाय्यक पोलीस अधीक्षक, ३१ जिल्हा पोलीस उपअधीक्षक, १२६ पोलीस निरीक्षक, ३६० सहायक पोलीस निरीक्षक असा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. चाळीस व्हिडिओ कॅमेरे, ३०६ सीसीटीव्ही, बारा ड्रोन, पन्नास दुर्बिणी, पोलिसांच्या हेल्मेटमधील आणि छुप्या ५० कॅमेऱ्यांद्वारे बारीक नजर असेल.