वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राची तत्परता
पिलीव/ सुजित सातपुते
आषाढी पायी पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माळशिरस तालुक्यातील पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राने उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना तत्काळ व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चार स्वतंत्र औषधोपचार व आरोग्य तपासणी स्टॉल उभारण्यात आले आहेत.
या स्टॉलवर वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे मोफत वितरण, प्रथमोपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा त्रास झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय पथक दिवसरात्र कार्यरत आहे.
याशिवाय, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकरी व आरोग्य कर्मचारी यांना सुरक्षित आसरा मिळावा म्हणून भव्य जर्मन शेडची उभारणी करण्यात आली आहे. या शेडमुळे पावसापासून संरक्षण मिळत असून, वारकऱ्यांना आरामदायी वातावरणात उपचार घेणे शक्य होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध जनजागृती अभियानांची माहितीही या केंद्रातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. आरोग्य सेवा, जनजागृती आणि वारकऱ्यांच्या सुविधांचा समन्वय साधत पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राने मानवसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
स्थानिक नागरिक व वारकरी भाविकांकडून डॉ. विलास जाधव आणि संपूर्ण आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक करण्यात येत असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेली ही व्यवस्था आषाढी वारीतील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.