विद्रोहाचा धगधगता निखारा ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे

पिलीव /सुजित सातपुते

लेखणी जेव्हा रक्ताची शाई करून व्यवस्थेच्या छाताडावर प्रश्न कोरू लागते, तेव्हा नितीन चंदनशिवे नावाचा एक ‘दंगलकार’ जन्माला येतो. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांच्या कवितांनी आणि विचारांनी तरुण पिढीला अस्वस्थ केले आहे, ते नाव म्हणजे नितीन चंदनशिवे. त्यांची कविता ही निव्वळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर तो प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध फुंकलेला एल्गार आहे.सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हे नितीन यांचे मूळ गाव. बालपण अत्यंत हलाखीत आणि गरिबीत गेले. वडिलांनी आयुष्यभर गवंडी काम करून कुटुंब सावरले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नितीन यांनी कधी सुरक्षारक्षक (वॉचमन) म्हणून रात्री जागवल्या, तर कधी भर उन्हात भाजी विकली. पण या संघर्षाने त्यांना खचवले नाही, तर अधिक धारदार केले. या खडतर प्रवासात त्यांच्या हाती महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आले आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

सामाजिक वास्तव, राजकारण, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि शतकानुशतके चालत आलेली क्रूर जातिव्यवस्था यांवर नितीन चंदनशिवे अत्यंत परखड आणि विद्रोही भाष्य करू लागले म्हणूनच त्यांना महाराष्ट्राने ‘दंगलकार’ ही पदवी दिली. त्यांची “आमचा कांबळे” ही कविता जेव्हा सोशल मीडियावर आली, तेव्हा ती केवळ व्हायरल झाली नाही, तर तिने करोडो काळजांना घरे पाडली. “कांबळे रडला नाही, नुसताच कन्हला…” ही ओळ जेव्हा त्यांच्या आवाजात घुमते, तेव्हा बहुजन समाजाच्या शतकानुशतकांच्या वेदना जिवंत होतात. ही कविता मनोरंजनासाठी नाही, तर ती झोपलेल्या समाजाला लाथ मारून जागी करणारी आहे.
नितीन चंदनशिवे यांच्या कवितेची ताकद काय आहे, याचा प्रत्यय शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) ६० व्या वर्धापन दिन सोहळ्यात सबंध महाराष्ट्राने घेतला. व्यासपीठावरून जेव्हा नितीन यांच्या कवितेचे आसूड कडाडू लागले, तेव्हा समोर बसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण सभागृहाचे डोळे पाणावले. शब्दांच्या माध्यमातून माणसाच्या संवेदनांना हात घालण्याचे आणि नेत्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांना अंतर्मुख करायला लावण्याचे अफाट सामर्थ्य त्यांच्या वाणीत आहे.
फुलें-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची मशाल
नितीन चंदनशिवे यांचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि डोके महापुरुषांच्या विचारांनी परिपक्व आहे. ते केवळ कवी संमेलने गाजवणारे कवी नाहीत, तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आपल्या व्याख्यानांच्या आणि कवितांच्या माध्यमातून तरुणाईत वैचारिक जागृती घडवून आणणारे क्रांतीदूत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करत, व्यवस्थेला न डगमगता जाब विचारणारा हा ‘दंगलकार’ आजच्या घडीला शोषितांचा सर्वात बुलंद आवाज बनला आहे.
जोपर्यंत समाजात अन्याय जिवंत आहे, तोपर्यंत नितीन चंदनशिवे यांच्या कवितेचा हा धगधगता निखारा असाच पेटत राहील,यात तीळ मात्र शंका नाही,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *