डॉ मंगेश लवटे यांची नातेपुतेत धडक कारवाई ; ५३ हजारांचा पॅकेज्ड पाणी व मँगो ज्यूस साठा जप्त, कंपनीला तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश

पिलीव/सुजित सातपुते
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारत नातेपुते येथील मे. सत्यवेल ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर शनिवारी (दि. १८ जुलै) धडक छापा टाकला. या कारवाईत ५३ हजार रुपये किमतीचा तब्बल १,३८४ लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूसचा साठा जप्त करण्यात आला असून, गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित कंपनीला तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन, सोलापूर कार्यालयाला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांनी संबंधित आस्थापनेवर अचानक धाड टाकली. तपासणीदरम्यान पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूसचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच ५८४ लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व ८०० लिटर मँगो ज्यूस, असा एकूण १,३८४ लिटरचा साठा संशयास्पद आढळून आला.

तपासणीमध्ये संबंधित उत्पादनांमध्ये लेबलिंगमधील गंभीर त्रुटी, दर्जाबाबत संशय तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत ‘शेड्यूल-४’ (Schedule IV) मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित साठा तात्काळ जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर, तपासणीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींची पूर्तता होईपर्यंत संबंधित आस्थापनेला व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. या कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (पुणे विभाग) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी सा. ए. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे आणि सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांच्या पथकाने पार पाडली.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पॅकेज्ड पाणी, ज्यूस किंवा इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना उत्पादनावरील लेबल, उत्पादन व कालबाह्यता दिनांक, एफएसएसएआय परवाना क्रमांक आणि दर्जाची खात्री करूनच खरेदी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशाराही डॉ. मंगेश लवटे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *