सचिनसिंग भैस यांचा आदर्श उपक्रम : वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पोपहार वाटप

पिलीव/ सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सामाजिक बांधिलकी जपणारे युवक श्री.सचिनसिंग भैस(राजपूत)यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पिलीव तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पोपहाराचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

यावेळी शाळेच्या वतीने भैस यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.

पिलीव येथील बचेरी चौकात नामांकित आशा ‘गुरुकृपा सेंटर’ या नावाने स्वादिष्ट व चवदार वडापाव विक्रीचा व्यवसाय करणारे सचिनसिंग भैस हे आपल्या व्यवसायासोबतच समाजकार्यातही सातत्याने सक्रिय असतात.विशेषतः शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांना असलेली आत्मीयता त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांतून वारंवार दिसून येते.दरवर्षी वाढदिवसाचा गाजावाजा, डीजे, फटाके किंवा अन्य दिखाऊ खर्च टाळून ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजूंना मदत तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करतात.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना कायम मनात असते. त्यामुळे माझ्या उत्पन्नातील खारीचा वाटा गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचा मी प्रयत्न करतो. वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी आहे.प्रत्येकाने वाढदिवसानिमित्त डीजे, ढोल-ताशे व फटाक्यांवर खर्च न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. अशा कृतीतून गरजू विद्यार्थ्यांना प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते.असे भैस यांनी माळशिरस टाइम्स बोलताना सांगितले,

सामान्य व्यवसाय करत असतानाही समाजाप्रती असलेली जाणीव जपत सचिनसिंग भैस यांनी राबविलेला हा आदर्श उपक्रम इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातून सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *