एकट्या पट्ट्याने केले अकलूज बंद
पिलीव/सुजित सातपुते
उषाताई साठे प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी अकलूजमध्ये बुधवारी झालेल्या बंदला व्यापारी,नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शांतता समितीने बंदाला विरोध दर्शविल्याची चर्चा असतानाही योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर राजाभाऊ खिलारे यांनी दिलेल्या अकलूज बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली.संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला आणि उषाताई साठे यांना अकलूजकरांनी बंदच्या माध्यमातून खरी श्रद्धांजली अर्पण केली असल्याचे पहावयास मिळाले.

उषाताई साठे यांना न्याय मिळावा, या उद्देशाने मातंग समाजासह विविध सामाजिक संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालय असा निषेध मोर्चा काढत शासनाकडे ठोस मागण्या मांडल्या. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पिस्तूलाच्या परवानाधारकास सहआरोपी करण्याची मागणी, सदर प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्याची मागणी, मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी तसेच पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत व पुनर्वसन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, अकलूज बंद यशस्वी झाल्यानंतर शेखर खिलारे यांनी नतमस्तक होऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून अकलूजकरांचे जाहीर आभार मानले. “उषाताई साठे यांना न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात नागरिकांनी दाखविलेली एकजूट ही समाजाच्या संवेदनशीलतेची आणि न्यायासाठीच्या बांधिलकीची साक्ष असून या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व व्यापारी, नागरिक, सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार,” असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे,
उषाताई साठे प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत न्यायासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार खिलारे व त्यांच्यासह असणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी माळशिरस टाइम्सशी बोलताना व्यक्त केला.
सदरचा बंद यशस्वी करण्यासाठी व उषाताई साठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माझ्या सर्व बंधू-भगिनींनी व अकलूज येथील व्यापारी वर्गाने माझ्या निस्वार्थी लढाईवर विश्वास ठेवून मी दिलेल्या अकलूज बंद या हाकेला प्रतिसाद दिला व दलित विरोधी शांतता कमिटीचा डाव हाणून पाडला,त्यातच तमाम दलित समाजाचा विजय आहे,# शेखर खिलारे,अकलूज