सख्खा भाऊ,पक्का वैरी !शेतातील वादातून भावाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न; खोऱ्याच्या दांड्याने हल्ला, एक गंभीर जखमी

पिलीव/सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथे शेतातील झुडपे काढण्याच्या कारणावरून सख्ख्या भावामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाले.या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिलीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रावसाहेब साहेबराव सातपुते (वय ५४, रा. कुसमोड, ता. माळशिरस) हे ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतातील खुरटी झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढत होते. त्यावेळी त्यांचे भाऊ कृष्णा साहेबराव सातपुते व भावजय द्वारका कृष्णा सातपुते यांनी संगनमत करून वाद घालत फिर्यादीवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी कृष्णा सातपुते यांनी प्रथम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हातातील खोऱ्याच्या लाकडी दांड्याने फिर्यादीच्या मानेच्या मागील भागावर व डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या मानेचे मणके मोडून ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच दुसऱ्या आरोपीने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद पोहेकॉ. सोनटक्के यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे करीत आहेत.

या घटनेमुळे कुसमोड परिसरात एकच खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *