मयत लाभार्थ्यांच्या वारस नोंदी रखडल्या ; शेकडो गोरगरीब कुटुंबे घरकुलापासून वंचित,पावसाळ्यात गळक्या घरात संसार ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी

पिलीव/सुजित सातपुते

केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असले, तरी लाभार्थी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसाच्या नावावर नोंद (वारस नोंद) करण्याची प्रक्रिया राज्यस्तरावरून बंद असल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक गोरगरीब, वंचित, शोषित व पीडित कुटुंबे आजही स्वतःच्या हक्काच्या घरकुलापासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परिणामी अनेक कुटुंबांना पावसाळ्याच्या दिवसांत गळक्या व जीर्ण घरात जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे.

माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात अशा अनेक लाभार्थ्यांचे निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांनी वारस म्हणून नोंद करून घरकुलाचा लाभ देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून केली आहे. मात्र, संबंधित पंचायत समित्यांकडून “वारस नोंदीची प्रक्रिया सध्या राज्यस्तरावरून बंद आहे” असे सांगितले जात असल्याने लाभार्थ्यांचे वारस अक्षरशः हेलपाटे मारून दमून गेले आहेत.

सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अनेक कुटुंबांच्या घरांना मोठ्या प्रमाणात गळती लागत असून पावसाचे पाणी थेट घरात शिरत आहे. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे तसेच शालेय विद्यार्थ्यांची दप्तरे, वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य भिजून खराब होत आहे. सुरक्षित निवाऱ्याअभावी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

डिजिटल युगात शासनाकडून सर्व सेवा ऑनलाइन होत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे वारस नोंदीसारखी मूलभूत प्रक्रिया रखडल्यामुळे गरीब कुटुंबांचे स्वप्न भंग होत असल्याची भावना लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मंजूर घरकुल असूनही केवळ प्रशासकीय प्रक्रियेअभावी लाभ मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

याबाबत संबंधित कुटुंबीयांनी राज्य शासनाने वारस नोंद प्रक्रिया तात्काळ सुरू करून पात्र वारसांच्या नावावर घरकुल मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून संबंधित विभागाला तातडीचे निर्देश द्यावेत, जेणेकरून रखडलेल्या वारस नोंदी पूर्ण होतील आणि पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर उभारण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, अनेक गावांमध्ये अशा प्रकारची प्रकरणे प्रलंबित असून, त्याचा फटका सर्वसामान्य गरीब कुटुंबांना बसत आहे. शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हानिहाय विशेष मोहीम राबवून मयत लाभार्थ्यांच्या वारसांची नोंद पूर्ण करावी व पात्र कुटुंबांना तातडीने घरकुलाचा लाभ द्यावा, अशी जोरदार मागणी माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील वंचित, शोषित आणि पीडित घटकांकडून होत आहे.

माझ्या वडिलांच्या नावे 2018 साली घरकुल मंजूर झाले आहे व 2023 साली माझ्या वडिलांचे निधन झाले आहे,तेव्हापासून मी पाठपुरावा करतोय परंतु आजपर्यंत वारसाची नोंद लागलेली नाही,माझ्यासारखीच अनेक जणांची अडचण आहे, त्यामुळे खूप लोक केवळ वारस नोंदीमुळे घरकुला पासून वंचित राहिले आहेत, अमोल सुतार,पिलीव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *