उद्या राज्यभर शाळा बंद आंदोलन ; सर्व शिक्षक संघटनांनी सहभागी व्हावे – प्रदीप अवताडे

पिलीव/सुजित सातपुते

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने उद्या गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनात राज्यातील विविध शिक्षक संघटना सहभागी होणार असून शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असून, १४ मे २०२६ रोजी शिक्षण संचालक, पुणे यांनी काढलेले सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या सेवेला बाधा आणणारे पत्र रद्द करावे, टीईटी परीक्षा रद्द करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अथवा याबाबत स्वतंत्र भूमिका घ्यावी, संचमान्यतेबाबतचा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा तसेच SIR व BLO ही निवडणुकीपूर्व कामे शिक्षकांवर सोपवू नयेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी सामूहिक रजा अर्ज संबंधित केंद्रप्रमुखांकडे सादर करून शाळा पूर्णतः बंद ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच दुपारी १ वाजता सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे एकत्र जमून तेथून पुनम गेट मार्गे जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चादरम्यान विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

पावसाळ्याचा विचार करून सहभागी शिक्षकांनी छत्री, रेनकोट व पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवावी तसेच आयोजकांच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्य किंवा इतर गंभीर कारणांमुळे मोर्चात सहभागी होणे शक्य नसलेल्या शिक्षकांनी सामूहिक रजा अर्ज सादर करून शाळा बंद आंदोलनात सहभागी व्हावे आणि आंदोलनाचा प्रचार-प्रसार विविध माध्यमांतून करावा, असे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे.

राज्यातील सर्व शिक्षक, पालक, सामाजिक संघटना आणि शिक्षण संस्थांनी या आंदोलनाला व्यापक पाठिंबा द्यावा,असे किरण काळे यांनी माळशिरस टाइम्सच्या वतीने आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *