कृत्रिम दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटवर अन्न व औषध प्रशासनाचा निर्णायक प्रहार ; पाच जिल्ह्यांत एकाचवेळी धाडी !
पिलीव/सुजित सातपुते
सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंध असलेल्या कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित रॅकेटवर अन्न व औषध प्रशासनाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली. पुणे, सोलापूर, अहमदनगर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी टाकलेल्या धाडीत सुमारे १.४८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अनेक दिवस गुप्त तपास करण्यात आला. तपासादरम्यान कृत्रिम दूध तयार करण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, डेअरी परमिएट पावडर, डिटर्जंट, इमल्सिफायर, शॅम्पू, पामतेल यांसारख्या पदार्थांचा वापर करून ते नैसर्गिक दुधात मिसळून बाजारात विक्रीस पाठविले जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर या संपूर्ण पुरवठा साखळीचा मागोवा घेत दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर, डेअरी, पॅकिंग युनिट, गोदामे आणि वितरण व्यवस्थेवर एकाचवेळी धाड टाकण्यात आली.
या कारवाईत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, यंत्रसामग्री, कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची नोंद तसेच इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. ४१ नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी संकलित करण्यात आले असून, तपास अहवालाच्या आधारे आणखी संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक आरोग्याला तात्काळ धोका निर्माण होऊ नये, यासाठी संशयित दूध घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने अटक आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, या रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी आणि इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात भविष्यातही गुप्तवार्ता आधारित अशाच व्यापक व कठोर कारवाया सुरू राहतील,असा इशारा सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे दिला आहे.