पिलीव गावाला अद्याप हिंदू स्मशानभूमी नाही ; मृतांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर
पिलीव/ सुजित सातपुते
आधुनिक विकासाच्या गप्पा, कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि विकासाचे दावे करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कारभारावर पिलीव गावातील एक मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.सुमारे 11500 लोकसंख्या असलेल्या पिलीव गावात आजतागायत हिंदू धर्मासाठी सुसज्ज स्मशानभूमी उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
उन्हाळ्यात किंवा कोरड्या हंगामात हा प्रश्न काही प्रमाणात झाकला जातो; मात्र पावसाळ्यात मुसळधार पावसात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा अत्यंत वेदनादायी प्रश्न मृताच्या कुटुंबीयांसमोर उभा राहतो. दुःखाच्या प्रसंगीही मृतदेहाला सन्मानाने अग्नी देण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे ही गावाच्या विकासाला लागलेली मोठी शोकांतिका मानली जात आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की हा प्रश्न ऐरणीवर येतो. नागरिक प्रत्यक्षात शांत राहतात; मात्र सोशल मीडियावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते.यंदाही पावसाच्या पहिल्याच परीक्षेत हा प्रश्न पुन्हा समोर आला असून सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून नेटकरी अक्षरशा शिव्या घालू लागले आहेत,
गावात विविध विकासकामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना,मृत व्यक्तीच्या सन्मानासाठी आवश्यक असलेली हिंदू स्मशानभूमी उभारण्यास मात्र आजपर्यंत प्राधान्य का दिले गेले नाही ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
आता तरी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी तातडीने कायमस्वरूपी, सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त हिंदू स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी गावकऱ्यांची तीव्र मागणी आहे.अन्यथा दरवर्षी पावसाळ्यात मृतांच्या सन्मानाचा हा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहत राहील आणि लोकप्रतिनिधी अश्लील भाषांचा प्रसाद खात राहतील हे मात्र नक्की !
आमच्या पिलीव गावामध्ये जिवंत माणसाला सुख सुविधांचा अभाव आहे मग मेल्यानंतर तर सोडाच. पिलीव गाव सोडले तर सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये एकही असे गाव नसेल की जिथे हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही.त्यामुळे पिलीव गावची गिनीज बुकात नोंद व्हावी,
#एक सामान्य नागरिक,पिलीव