पिलीव प्रीमियर लीग 2026 च्या पहिल्याच पर्वात “एन.एस. अंकुश भैस 11” या संघाचा विजेतेपदावर दणदणीत कब्जा!

पिलीव/ सुजित सातपुते

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पिलीव प्रीमियर लीग (PPL) 2026 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज बुधवारी दि.1 जुलै 2026 रोजी ॲड.मानसिंह जहागीरदार क्रीडा संकुलावर अत्यंत उत्साहात पार पडला.अंतिम लढतीत एन.एस अंकुश भैस 11 या संघाने स्वराज्य 11 संघावर तब्बल 57 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या पहिल्याच पर्वातील विजेतेपद पटकावले.

प्रथम फलंदाजी करताना एन.एस अंकुश भैस 11या संघाने दमदार खेळ करत 57 धावांचे लक्ष्य उभे केले. संघाकडून आकाश सुळे याने सर्वाधिक 29 धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचला.त्याला एल.बी गोरे याने 9 धावांचे मोलाचे योगदान दिले.

57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्वराज्य 11 संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली असल्याचे पहावयास मिळाले,एन.एस 11 च्या अचूक व भेदक गोलंदाजीसमोर स्वराज्यचा एकही फलंदाज टिकाव धरू शकला नाही.परिणामी स्वराज्य 11 संघाचा डाव 6 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 23 धावांवर आटोपला आणि त्यांना 57 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

एन.एस अंकुश भैस 11 या संघाच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली,एल.बी गोरे याने अवघ्या 2 षटकांत 3 धावा देत 3 बळी घेत सामन्यावर वर्चस्व गाजवले तर यंगा सुळे याने 2 षटकांत 18 धावा देत 2 बळी व अंकुश भैस याने 1 बळी घेत उत्कृष्ट साथ दिली.

या विजेतेपदाचा मानकरी ठरलेल्या एन.एस अंकुश भैस संघाचे नेतृत्व आयकॉन व कर्णधार एल. बी गोरे यांनी केले.तर संघाचे संघमालक अंकुश भैस,मयुर भैस आणि योगेश देशमुख यांच्या नियोजनामुळे संघाने स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात विजेतेपदावर नाव कोरले.

पिलीव येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पिलीव प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला खेळाडू,क्रिकेटप्रेमी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अंतिम सामन्याने स्पर्धेची सांगता दिमाखदार वातावरणात झाली असून,पुढील हंगामाबाबतही क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पहावयास मिळत आहे,

माझ्या संघातील सर्वच खेळाडूंनी अतिशय प्रामाणिकपणे खेळून गावाला आपला खेळ दाखवून दिला व पिलीव गावची पहिली मानाची ट्रॉफी माझ्या संघाला मिळवून दिली, पिलीव प्रीमियर लीग 2026 पहिला मानकरी म्हणून माझ्या संघाचे नाव पिलीवच्या इतिहासात कोरले जाणार आहे,यातच मी व माझ्या संघातील खेळाडू समाधानी आहेत,# अंकुश भैस,संघ मालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *