पिलीव प्रीमियर लीग 2026 ला उत्साहात प्रारंभ : विशाल जनवर 11 व इरफान धुरंदर 11 पुढील फेरीत !
पिलीव/सुजित सातपुते
पिलीव येथील बहुप्रतिक्षित पिलीव प्रीमियर लीग (PPL) 2026 क्रिकेट स्पर्धेला आज सकाळी 9:00 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार,ॲड.मानसिंह जहागीरदार व पिलीव गावचे माजी सरपंच अमोल मदने-पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी खेळाडू,आयोजक, ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिलीव प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवशी नियोजित वेळापत्रकानुसार सामने रंगले.प्रत्येक संघाने विजेतेपदासाठी जोरदार संघर्ष करत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. चुरशीच्या सामन्यांनंतर विशाल जनवर 11 आणि इरफान धुरंदर 11 या दोन संघांनी दमदार कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला.दोन्ही संघांच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उल्लेखनीय कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडाभावना, शिस्त आणि संघभावना जपण्याचे आवाहन केले.पिलीव व पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून मैदानावर दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
स्पर्धेचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून सर्व सामने वेळेत पार पडत आहेत.आगामी फेरीत पात्र ठरलेल्या विशाल जनवर 11 आणि इरफान धुरंदर 11 या संघांकडून आणखी रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहायला मिळतील,अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.आयोजकांनीही स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व खेळाडू, मान्यवर आणि प्रेक्षकांचे आभार मानले.