तब्बल वीस वर्षांनंतर कर्मवीर विद्यालय पिलीवच्या 2005-06 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या झाल्या भेटी-गाठी !
पिलीव/सुजित सातपुते
काळाच्या प्रवाहात एकमेकांपासून दूर गेलेले माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर विद्यालयाच्या इ. दहावी सन 2005-06 च्या विद्यार्थ्यांनी तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत पिलीव येथील श्री स्वामी समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये अविस्मरणीय गेट-टुगेदर साजरा केला.जुन्या आठवणींनी,हास्य-विनोदांनी आणि आत्मीयतेच्या वातावरणाने भरलेला हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या गेट-टुगेदरला त्या सालातील मार्गदर्श शिक्षक सातपुते मॅडम,काळे सर, जगधाने सर,देशमुख सर,मदने सर उपस्थित होते.त्यांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भावनिक रंग प्राप्त झाला.सुमारे 80 ते 90 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात हजेरी लावली. बालपणीचे मित्र-मैत्रिणी,शालेय आठवणी, वर्गातील गंमती-जमती,तसेच शिक्षकांबरोबरच्या अनुभवांची उजळणी करत सर्वांनी एकत्रित क्षणांचा मनमुराद आनंद घेतला.कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उत्साहातून केले होते.विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून गेट-टुगेदरची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देणारे अनुभव कथन,विनोदी प्रसंग,सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच शिक्षकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला.

या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत एकत्र येण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी होत असलेले पाहून आम्हालाही अभिमान वाटतो,असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला व पुणे येथील प्रसिद्ध अँकर अमृता विधाते मॅडम यांनी वेगवेगळ्या फनी गेम्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली,त्यानंतर सर्वांनी पुन्हा भेटू आणि “कर्मवीर विद्यालयाच्या नात्याने आपली मैत्री कायम ठेवू” अशी भावना व्यक्त केली.या सोहळ्याने जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांच्या मनात आनंद आणि भावनांचा महापूर आला असल्याचे पहावयास मिळत होते,पिलीव येथील या 20 वर्षानंतरच्या ऐतिहासिक भेटीची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे.