पिलीव येथील मुस्लिम युवकांनी घडवून आणले हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन !

पिलीव/सुजित सातपुते

हिंदू म्हणे हरि माझा,मुस्लिम म्हणे अली माझा,दोघेही सांगती ईश्वर एकच,मग भेद कुठे दिसे माझा या तुकोबाच्या अभंगातील म्हणीप्रमाणे धर्म-जात विसरून एकमेकांना मदत करण्याची संस्कृती आजही ग्रामीण भागात जिवंत आहे,याचा प्रत्यय नुकताच पंढरपूर-पिलीव मार्गावर दिसून आला.रस्त्यावरील अपूर्ण कामामुळे पिलीव – पंढरपूर रोड वरती असणारा शिंप्याचा ओढा या ठिकाणी रस्त्यावरच एक भला मोठा खड्डा पडला आहे आणि बरोबर त्याच खड्ड्यामध्ये सोलापूर येथील विनायक पाटील,भुसार मालाचे व्यापारी या व्यापाऱ्याची मालवाहतूक करणारी पिकअप गाडी अडकून बसली आणि थोड्याच वेळात संपूर्ण रस्ता जाम झाला,वाहन बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्याने अनेक प्रयत्न केले,मात्र सर्व निष्फळ ठरले.
अशा वेळी पिलीव गावातील तीन मुस्लिम युवक आरमान अल्लाउद्दीन शेख,अमन याकूब सय्यद आणि आसिफ मुनेरखान पठाण यांनी कसलाही विचार न करता पुढाकार घेतला आणि त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर आणून गाडी सुरक्षितपणे बाहेर काढली. त्यांच्या या वेळेवर केलेल्या मदतीमुळे व्यापाऱ्याचा मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर व्यापाऱ्याने भावनिक होत तिघा बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले. या प्रसंगाचे गावात सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामस्थांनीही या युवकांचे अभिनंदन केले.धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ आहे याचा जिवंत दाखला या घटनेने दिला आहे,अशी प्रतिक्रिया ट्राफिक मध्ये अडकलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.ही घटना समाजात बंधुभाव, ऐक्य आणि सद्भावनेचा संदेश देणारी ठरली असून पिलीव गावातील या तीन मुस्लिम तरुणांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत एक अभिमानास्पद कामगिरी बजावली असल्याने त्यांचे कौतुक होत असल्याचे पहावयास मिळत आहे,

माझी जात भारतीय व धर्म माणुसकी आहे,त्यामुळे मला जात-धर्म विचारण्याऐवजी संकट काळात अडकलेल्या लोकांना मदत करायला आवडते,

#आरमान शेख,पिलीव

            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *