पिलीव येथील मा.ग्रा.पं सदस्या सौ.अनिता अविनाश जेऊरकर यांनी गौराईसमोर समोर साकारला पारंपारिक डोहाळ जेवणाचा देखावा !
पिलीव/ सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सामाजिक कार्यकर्त्या व माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.अनिता अविनाश जेऊरकर यांनी यंदा हरितालीका तीज व गौराई पूजनाच्या निमित्ताने गावामध्ये एक आगळावेगळा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविला असल्याचे दिसून आले.पारंपारिक रितीरिवाजांनुसार गौराई समोर डोहाळ जेवणाचा सुंदर व देखणा देखावा साकारून पिलीव परिसरातील भाविकांना एक अप्रतिम आध्यात्मिक अनुभूती दिली आहे.गावातील महिला मंडळी,युवती व लहान मुली मोठ्या उत्साहाने हा देखणा देखावा पाहण्यासाठी उपस्थित होत्या. झोपाळा,त्या झोपाळ्यात बसलेली नवरा-नवरीची जोडी,त्या जोडीला कुर्ता व पारंपारिक साडी,हिरव्या बांगड्या,गजरा,मंगल वेशभूषेत महिलांनी गौराईच्या समोर गीत गातानाचे बाहुले,सांस्कृतिक नृत्याचे आयोजन,डोहाळ जेवणाच्या ताटामध्ये गुलाब जामुन,पेढे,बर्फी, वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट,आंबट-गोड पदार्थ, फळा-फुलांच्या माळा,रंगबेरंगी तोरण यांसह आकर्षक रांगोळ्यांनी कार्यक्रमाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले असल्याचे पहावयास मिळाले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील विस्मृतीत गेलेल्या परंपरांना पुन्हा जागवण्याचा व महिलांना एकत्र आणण्याचा केलेला हा प्रयत्न असून सौ.जेऊरकर यांनी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने हा देखावा अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात सजविला होता.गावातील मान्यवर व विविध क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारच्या सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्व अधोरेखित केले.सौ.अनिता जेऊरकर यांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की”आपल्या मातृसंस्कृतीतील परंपरा व श्रद्धा यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे.महिलांच्या सहभागातून गावात ऐक्य व आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे हीच या उपक्रमामागची खरी प्रेरणा आहे,
“माझ्या पत्नीने घरातील सगळ्यांना एकत्र आणून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला एक नवा उत्साह दिला हेच आमच्या कुटुंबासाठी तिचे खूप मोठं योगदान आहे.”
श्री.अविनाश जेऊरकर