कायद्याचे पालन करा,सहकार्य राहील अन्यथा कारवाई अटळ – पोनि विकास दिंडोरे
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विश्रामगृहामध्ये आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिलीव गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे साहेब यांच्या उपस्थितीत पिलीव येथील विश्रामगृहामध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती,
या बैठकीस पिलीव परिसरातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष,सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत मंडळांच्या विसर्जन मिरवणूक मार्ग,डीजे व ध्वनिक्षेपक वापराचे नियम,पार्किंग व्यवस्था,आपत्कालीन सेवांची उपलब्धता,वीज पुरवठा, तसेच स्वच्छतेसंबंधी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पोलीस निरीक्षक दिंडोरे यांच्याकडून सर्व मंडळांना कायद्याचे पालन करण्याचे आणि उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले असून सामाजिक उपक्रम राबवून पारंपारिक व सांस्कृतिक पद्धतीने मिरवणूक काढणाऱ्या मंडळाचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मान केला जाईल असेही यावेळी दिंडोरी यांनी बैठकीच्या वेळी बोलताना सांगितले,तर मंडळांच्या वतीनेही पदाधिकाऱ्यांकडून सहकार्याचे आश्वासन देण्यात आले.तसेच काही मंडळांनी आपापल्या समस्या आणि सूचना यांची मांडणी केली,ज्यावर पोलीस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.अखेर गणेश उत्सव हा धार्मिक व सांस्कृतिक समन्वयाचा सण असून तो सर्वांनी मिळून अनुशासनात साजरा करावा, ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल अशांवर कडक कारवाई केली जाईल असेही सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर यांनी सांगितले,यावेळी पिलीव औट पोस्टचे हवालदार पंडित मिसाळ,शंकर मरळे,अमित जाधव यांसह परिसरातील पोलीस पाटील उपस्थित होते, बैठकीस उपस्थित असणाऱ्या पोलीस प्रशासनाचे व विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे यांनी आभार मानले,