पिलीव येथील “अथांग ऋषिकेश भैस” ठरला लक्षवेधी चिमुकला वारकरी
पिलीव/सुजित सातपुते
चिमुकला वारकरी चालतो पंढरीला
टाळ माळ घेऊनी हाक देतो विठ्ठला !
नभी विठ्ठलाचा गजर गुंजतो,
बाळकडू हरिपाठात गोड गळतो !
चिमणं पाऊल,मोठं स्वप्न घेई,
विठ्ठल माझा बाबा होई !
या अभंगाच्या भावार्थप्रमाणेच माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील गोपाळसिंग विष्णूसिंग भैस यांचे नातू व ऋषिकेश गोपाळसिंग भैस यांचा चिरंजीव म्हणजेच छोटा वारकरी अथांग ऋषिकेश भैस याने आपल्या वारकरी छबीतून पिलीव पंचक्रोशीतील विठ्ठल भक्तांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे पहावयास मिळाले,
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या भेटीला पंढरीकडे जाण्यासाठी पिलीव गावात काल वेग-वेगळ्या पायी दिंडीतील हजारो भाविक दाखल झाले होते,त्यात एक विशेष लक्ष वेधणारा वारकरी म्हणजे लहानसा चिमुकला अथांग वय केवळ ३ वर्षे असलेला हा चिमुकला वारकरी आपल्या आई-वडिलांसोबत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाला होता,त्याच्या डोक्याला पांढरी टोपी,कपाळाला चंदनाचा टिक्का,अंगात पांढरा शुभ्र नेहरू शर्ट,धोतर,गळ्यात ढोलकी व पांढऱ्या रंगाचे उपरणे,पायात कोल्हापुरी चप्पल आणि ओठांवर “विठ्ठल विठ्ठल”चा गजर असे हे दृश्य पाहून अनेकांची मने भरून आली होती.वाटेतील थकवा विसरून दिंडीतील अनेक आबाल,वृद्ध वारकरी या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भक्तीचं तेज पाहून त्याच्याबरोबर टाळ मृदुंगाच्या गजरावर ठेका धरून नाचत होते, तर काही वारकरी टाळ्या वाजवून त्याच्या या अभिनयाला दाद देत होते,पिलीव-पंढरपूरच्या रस्त्यांवरून चालणाऱ्या या चिमुकल्याला पाहून अनेक भाविक थांबून त्याचं कौतुक करत असल्याचे दिसत होते,तर पायी दिंडीतील अनेक वृद्ध वारकऱ्यांच्या तोंडातून चिमुकल्या वारकऱ्यासाठी विठ्ठल नाम तुझ्या श्वासात सामावो,अथांग बाळा तुझं जीवन आनंदमय होवो ! या शब्दात आशिर्वाद मिळत होते,
माझा मुलगा जेव्हा टाळ-माळ घेऊन दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत होता,तेव्हा माझ्या हृदयाला स्पर्श होत होता,
“ऋषिकेश भैस”,अथांगचे वडील