म्हसवड-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पिलीवच्या मुख्य अशा आहिल्या चौकातील रखडलेले काम त्वरित पूर्ण करा : अन्यथा 1 ऑगस्टला रास्ता रोको – संग्रामसिंह जहागीरदार
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यात पिलीव येथील सातारा-सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील म्हसवड ते पंढरपूर 458 या राष्ट्रीय महामार्गवरील माळशिरस तालुक्यातील पिलीव गावाच्या मुख्य अशा आहिल्या चौकातील रस्त्याचे तीन-चार वर्षांपासून काम रखडलेले आहे.अपूर्ण ठेवलेले काम रखडले असल्यामुळे त्या ठिकाणच्या चौकात दळणवळणाची अत्यंत गैरसोय होत असून वाहतुकीची कोंडी व पावसामुळे घसरण तयार होवून छोटे-मोठे अपघात होत आहेत.तर उन्हाळ्यात धुळीच्या साम्राज्यामुळे वाहन चालकांना व लगतच्या व्यापारी व दुकानदार लोकांना,शालेय विद्यार्थांना होणारा त्रास हा भयानक आहे.चौकाच्या दोन्ही बाजूला चढ-उतार केल्याने वाहनधारकांना अत्यंत त्रास होत असून वारंवार अपघात घडत आहेत.



याच अणुशंगाने म्हसवड-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पिलीव येथील मुख्य चौकातील रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा येत्या 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत पिलीव चौकात रास्ता रोको करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक व निवेदन माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आज रोजी जाहीर केले आहे.यापूर्वी पिलीव ग्रा.पंचायतने वेळोवेळी सदरचा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा केला होता.परंतु ग्रामपंचायतीने दिलेल्या पत्राची दखल न घेता संबधितांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही म्हणून हा रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संग्रामसिंह जहागीरदार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.येत्या 1 ऑगस्ट 2023 पर्यंत जर या रस्त्याचे काम सुरू नाही केले तर रस्ता रोको करणार असल्याच्या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम राहणार असून रास्ता रोको करण्याचा आमचा उद्देश म्हणजे पिलीव चौकातील अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण होण्याचा असून आमचा कोणालाही त्रास देण्याचा किंवा वेटीस धरण्याचा हेतू नाही.नागरिकांच्या सोयीसाठी व दळणवळणातील गैरसोयी दूर करून वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठीच येत्या 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 ते 11 पिलीव बस स्थानकावरील आहिल्या चौकात रास्ता रोको करण्याचा आमचा निर्धार पक्का असल्याचे जहागीरदार यांनी सांगितले.यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र करांडे यांनीही निवेदन देऊन निवेदना मागील पार्श्वभूमीची माहिती पत्रकारांना दिली.त्याचप्रमाणे या निवेदनाच्या प्रती माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील,माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामभाऊ सातपुते,अकलूज विभागाचे पोलीस उपाधीक्षक,प्रांताधिकारी अकलूज,पोलीस अधीक्षक सोलापूर,तहसीलदार माळशिरस व पोलीस निरीक्षक माळशिरस यांना या निवेदनाच्या प्रती रजिस्टर पोस्टाने व काही ना समक्ष दिल्या असल्याचे करांडे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील,सुळेवाडी सोसायटीचे चेअरमन पांडूसिंग जनवर,माजी उपसरपंच संजय आर्वे,ग्रा.पं सदस्य अविनाश जेऊरकर,रणधीरसिंग जामदार,मोहसीन शेख,समशेरसिंग रजपूत,तानाजी लोखंडे यांसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.