इंदिरा अस्वार यांना क्लीनचिट देणारे बार्टीचे सुनील वारे महासंचालक की न्यायाधीश ? जनतेचा सवाल..!

 पिलीव/प्रतिनीधी 
बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांनी कोर्टाचा अवमान करून प्रशासकीय नियमांचा भंग केल्याने सामाजिक न्याय विभागाने त्यांना पदमुक्त करण्यासाठी कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. त्याचबरोबर तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सुध्दा इंदिरा अस्वार यांना पदमुक्त करून त्यांची विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी केलेली असताना काही दिवसांपूर्वीच महासंचालक पदावर रूजू झालेल्या सुनील वारे यांनी त्यांच्याबद्दल तात्काळ सकारात्मक अहवाल दिल्याने सुनील वारे महासंचालक आहेत की न्यायाधीश आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी निबंधक इंदिरा अस्वार यांना पदमुक्त केल्यानंतर त्या मॅटमध्ये गेल्या. तेव्हा शासनाने पुन्हा एकदा इंदिरा अस्वार यांना पदमुक्त करण्याशिवाय पर्याय नाही असे मॅटमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र सुनील वारे यांना बार्टी कळायला अजूनही अवकाश असताना त्यांनी इंदिरा अस्वार यांच्याबद्दल अतितात्काळ सकारात्मक अहवाल दिलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करून महासंचालक सामाजिक न्याय विभागाच्या सचिवापेक्षा मोठे कधीपासून झाले? अशी चर्चा जनतेतून होताना दिसत आहे. इंदिरा अस्वार यांच्यावर कोर्टाचा अवमान करणे, प्रशासकीय नियमांचा भंग, भीमा कोरेगांव प्रकरणाबद्दल चौकशी असे अनेक आरोप असताना सुनील वारे त्यांच्याबद्दल पॉझिटीव्ह अहवाल सादर करून त्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे ते या संस्थेत नेमके कशासाठी आले आहेत? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. वास्तविक पाहता बार्टी ही संस्था एससी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेली संस्था आहे. याठिकाणी आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांना, उद्योजकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एससी समाजासाठी महाराष्ट्र सरकार दरवर्षी २५० कोटींचा निधी देत असते. पण या निधीवर डल्ला मारणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी सुनील वारे त्यांनाच खतपाणी घालताना दिसत आहेत ? त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबाबत सामाजिक न्याय विभाग काय निर्णय घेतंय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *