पिलीव येथे पिकअप वाहनाच्या धडकेने बौद्धाचार्य हर्षल वाघमारे गंभीर जखमी : वाहन चालक पिलीवचाच असल्याचा संशय बळावला..!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विठ्ठलवाडी येथे श्री महालक्ष्मी नर्सरी रोपवाटिकेच्या नजीकच्या धोकादायक वळनामध्ये झिंजेवस्ती येथील बौद्धाचार्य हर्षल वाघमारे यांच्या दुचाकी गाडीला समोरून धडक देऊन अज्ञात पिकअप वाहन चालक न थांबता निघून गेला आहे. दरम्यान सदर गुन्ह्याची नोंद अद्याप कोणत्याही पोलीस स्टेशनला झालेली नाही.परंतु प्राथमिक अंदाजानूसार पिकअप चालक पिलीव येथीलच असल्याचा संशय बळावला आहे.बौद्धाचार्य हर्षल वाघमारे आपल्या राहत्या घरापासून झिंजेवस्तीतून पंढरपूर-सातारा रोडवरून पिलीवकडे दुचाकीवर चालले असताना विठ्ठलवाडी येथील श्री महालक्ष्मी रोपवाटिका जवळ धोकादायक वळणात साळमुख कडे जाणाऱ्या पिकअप ने समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडून फरपटत जाऊन रस्त्यालगतच्या झुडपात पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून एक पाय बारा ठिकाणी मोडून अक्षरशा पायातील हाडांचा चूरा झालेला आहे.त्यांना जखमी अवस्थेत पंढरपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता रक्तस्राव व फॅक्चर जास्त प्रमाणात झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील आयुष्य मल्टीपर्पज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया चालू आहे.त्यांची प्रकृती अद्यापही स्थिर नसून त्यांना हॉस्पिटलच्या खर्चासाठी सुमारे बारा लाख रुपये खर्च येईल असे रूग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.हर्षल वाघमारे यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजनेतून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. सध्या पंढरपूर ते म्हसवड हा राष्ट्रीय राज्यमार्ग करणाचे काम सुमारे तीन वर्षापासून मंदगतीने सुरू असून बरेच ठिकाणी रस्त्याची व पुलाची कामे अर्धवट राहिलेली दिसत आहेत.त्यामुळे अशा अर्धवट करून ठेवलेल्या रस्त्यावरून वळणाच्या ठिकाणी मोटर सायकल वाहनांचे बरेच आत्तापर्यंत अपघात होत आलेले आहेत.किंबहुना अशा अपघातातून बरेच लोक जखमी होऊन काहींचा मृत्यू झालेले आहेत सध्या सर्वच कारखान्याची ऊस वाहतूक चालू असल्याने छोट्या-मोठ्या वाहनधारकांना अशा ठिकाणाहून वाहन चालविणे तारेवरची कसरत करून जीव मुठीत धरून चालवावे लाग आहे.बौद्धाचार्य हर्षल वाघमारे यांचा औषध उपचारासाठी सुमारे बारा लाखांच्या आसपास खर्च येणार असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले असल्याने सदरचा संपूर्ण खर्च पंढरपूर म्हसवड रोडच्या ठेकेदार रोडवेज कंपनीने करावा अशी मागणी आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते विकास धाईंजे, एन.डी.एम.जी चे राज्य सचिव वैभव गिते,केंद्रिय मानवधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,रिपाइं तालुका उपाध्यक्ष रणजीत सातपुते,रघुनाथ वाघमारे,यूवराज सातपुते यांनी केली आहे अन्यथा पंढरपूर म्हसवड रोडवर काम करू दिले जाणार नाही व तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा माध्यमांशी बोलताना दिला आहे.