शिवजयंती विशेष : रयतेचा राजा
एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्ठीत अशा मराठी साम्राज्याला..हिंदवी स्वराज्याला.. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती ..शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे मुघलांनी त्रासलेल्या जनतेसाठी एक शुभ शकुनच होता. त्रस्त जनतेला शिवरायांच्या जन्मानंतर एक आशेचा किरण दिसू लागला.सह्याद्रीच्या कुशीत पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील शिवनेरीवर १९ फेब्रुवारी १६३०,रोजी हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन कृष्ण तृतीयेला त्यांचा जन्म झाला. आदिलशाही,मुघलशाही, निजामशाहीच्या अत्याचारांनी संपूर्ण देशाला त्रस्त केलेलं असताना आपल्या संवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेऊन पिता शहाजी महाराज विजापूर च्या राजाच्या सेवेत आणि पुण्याच्या काही भागाचे ते जहागिरदार असतानासुद्धा अन्यायाविरुद्ध बंडखोरी करून अठरापगड जाती धर्मातील सर्वसामान्यांना सोबत घेऊन विशाल हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. अफजल खान, सिद्दी जौहर, शाहिस्ताखान यांसारख्या बलाढ्य आणि मी मी म्हणणार्या शत्रूंना नेस्तनाबूत करून शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगत राज्य उभं केले. भूगोलाचे ज्ञान, आश्चर्यकारक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरलं. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
इ.स. १६६५ मध्ये औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंहांना प्रचंड सैन्यासह पाठविले होते. शिवाजीराजांचा प्रतिकार कमी पडला,निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले. सर्व काही संपल्यातच जमा होतं परंतु पुन्हा एकदा स्वराज्याला आपल्या पराक्रमाने आणि नेतृत्व गुणांनी ते नवीन झळाळी मिळवून देऊ शकले,कारण त्यांनी आपल्या गुणग्राहक नजरेनं हेरलेली तानाजी मालुसरे, जिवाजी महाले,शिवाजी काशीद,बाजीप्रभू,बहिर्जी नाईक यांच्या सारखी ध्येय वेडी माणसं त्यांनी जपली. एके ठिकाणी म्हटले आहे , Perhaps it requires Depths of oppression to create heights of Character..अत्याचारी मुघली राजवटीविरुद्ध स्वराज्यासाठी जीवावर उदार होणारी अशी माणसं त्यांना भेटली. म्हणून तलवारीच्या घावाबरोबर स्वराज्य इंचाइंचानं वाढत गेलं..आणि मावळ्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबासोबत रयतेच्या हृदयात स्थानापन्न होत गेलं.
पराक्रमा सोबतच नैतिकता, धर्मनिरपेक्षता यांचा मार्ग अनुसरून न्याय्य भूमिकेतून सर्वांना पाहत , स्त्रियांबद्दल आदराची भावना दाखवून त्यांना आई बहिणीची उपमा दिली. ४ दशके स्वराज्यासाठी अविरत लढल्यानंतर ३ एप्रिल १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवराय अनंतात विलीन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मुघलांसोबतची मराठ्यांची लढाई चालूच राहिली. परंतु आज एवढ्या वर्षांचा कालावधी होऊनही शिवाजी राजे आजही रयतेच्या हृदयात आहेत.
- चैतन्यकुमार रघुनाथ देवकर
फर्ग्युसन महाविद्यालय पुणे