वेळापूरचा विशाल जाधव हा चोर फिर्यादी बनून तक्रार द्यायला गेला अन् पोलिसांनी गजाआड केला..!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील विशाल धनाजी जाधव (वय 19 वर्ष) हा फिर्यादीच चोर असल्याची खळबळजनक घटना पिलीव औट पोस्टचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रेय खरात त्यांनी उघडकीस आणली आहे.

सदर प्रकरणाची पिलीव पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पोकलेन मशीन वर काम करणाऱ्या बिहारी मजुरांजवळील मोबाईल व रोख रक्कम 29 हजार रुपये दिनांक 26 मे 2020 रोजी रात्री 11 ते 27 मे रोजी पहाटे 5 च्या दरम्यान कोणीतरी लबाडीने चोरून नेली असल्याची विशाल जाधव याने दिनांक 1 जून 2020 रोजी पिलीव औट पोस्टला फिर्याद दिली होती.त्यावरून माळशिरस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 302/2020 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबरमध्ये तरबेज असणारे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रेय खरात यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईलची सायबर शाखेकडून माहिती प्राप्त केली व सायबर कडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील फिर्यादच चोर असल्याचा संशय बाळगून त्याची कसून चौकशी करण्यात आली.यावेळी फिर्यादीने सदर गुन्ह्याची कबुली दिली व हकिकत समोर आली कि विशाल धनाजी जाधव हा काम करत असलेल्याच पोकलेन मशीन वर बिहारी मजूर हेल्पर व ऑपरेटर म्हणून काम करत होते ते या भागात नवीन आहेत.याचा फायदा घेवून त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम चोरीला गेल्याचा त्याने बनाव रचून दिनांक 26 मे 2020 रोजी चोरी केली व जाणीवपूर्वक फिर्याद देण्यास वेळ घालवून स्वतःच फिर्याद देण्यास पोलीस ठाणे गाठले होते.सदर चोरी करण्यासाठी त्याचा मित्र धनाजी उमाजी जाधव व विधीसंघर्षित बालक यांनी मदत केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर झाली होती.सदर तपासामध्ये त्यांच्याकडून 28000 रुपये किमतीचे 4 मोबाईल व रोख रक्कम रुपये 1000 असा गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिसाधिकारी निरज राजगुरु,पोलिस निरीक्षक विश्वंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर,पोहेकॉ सुधिर गोडसे,पोहेकॉ शिवाजी परांडे,पोकॉ दत्तात्रेय खरात,पोकॉ स्वप्निल गायकवाड,पोकॉ सतिश धुमाळ,पोकॉ खंडू माळी व नेम.सायबर पोलिस ठाणे यांनी केला आहे.