माळशिरस तालुक्यातील जनतेने अती सतर्क राहणे गरजेचे – डॉ.रामचंद्र मोहीते

पिलीव/सुजित सातपुते
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व सेवा व कर्तव्य सुरू आहेत.आज सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा देत आहेत.आज बुधवार दिनांक 25 मार्च रोजी माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहीते यांनी स्वतः तालुक्यातील 6 गावांना भेटी देऊन पाहणी व नियोजन केले आहे.पुणे मुंबई वरून आलेल्या काही रुग्णांना उपचार करण्यात आले व त्याठिकाणी जनजागृतीही करण्यात आली.आत्तापर्यंत तालुक्यात कुठलीही कोरोना पॉझिटिव्ह केस निघालेली नाही.परंतु आज पर्यंत केस पॉझिटिव्ह आली नाही म्हणून निर्धास्त अजिबात राहू नये.कधीही आपल्याकडे करोनाचा शिरकाव होऊ शकतो.विश्वास ठेवा विश्वास द्या घाबरू नका अफवा पसरवू नका.परंतु अती सतर्क रहा अन्यथा आपण कल्पनाही करु शकत नाही असे अनर्थ घडेल.त्यामुळे 21 दिवस घरातच बसून रहा आणि आपले गाव,आपला तालुका,आपला जिल्हा,आपले राज्य व आपला देश वाचवा असे पंचायत समिती आरोग्य विभाग माळशिरस यांच्यावतीने डॉ.रामचंद्र मोहिते यांनी माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी मोटेवाडी, तरंगफळ ,चांदापुरी, पिलीव व सुळेवाडी या भागाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना गाव पातळीवरील यंत्रणेला दिल्या. यावेळी पिलीव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे,डॉ.संतोष माने- आरोग्य सहाय्यक श्री राजू शेख, आरोग्य सेविका कोडे ,आर.जी व कर्मचारी वृंद, सुळेवाडी येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील ,आशा स्वयंसेविका उपस्थित होते.
