कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करा – धैर्यशील मोहिते-पाटील

पिलीव/सुजित सातपुते
संपुर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यासह राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करत उद्याचा गुढीपाडवा घरी राहूनच साजरा करावा,कोणीही नाहक रस्त्यावर उतरू नये,घरी राहूनच हा लढा यशस्वी करण्याच्या संकल्पाची गुढी सर्वजण उभी करूया असे शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील जनतेला माळशिरस टाईम्सच्या माध्यमातून आवाहन केले आहे.महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नवीन मराठी वर्षाचे स्वागत केले जाते.यानिमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी भेटत असतात.संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचे सावट आहे.

या भीतीच्या वातावरणात आलेल्या गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह आपण राखून ठेवावा.हे सावट दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सामूहिक आयोजन किंवा भेटीगाठी करू नयेत असे आवाहनही यानिमित्ताने धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे.राज्य सरकारच्या वतीने राज्यात २४ मार्च मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.विविध उपाययोजनांसह वारंवार काळजी घेण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी जबाबदारीने त्याला प्रतिसाद द्यावा व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत शासकीय स्तरावरून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करावे.उद्याच्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने एकजुटीने व संयमाने ‘कोरोना’ला परतवून लावू या संकल्पाची गुढी उभारावी असे आवाहन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *