पत्रकार प्रमोद भैस यांची हरवलेली सोन्याची अंगठी केली परत : सहाय्यक कृषी अधिकार्यांचा प्रामाणिकपणा..!
पिलीव/सुजित सातपुते
आज मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11:00 वाजता माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील नव्याने मंजूर झालेल्या 11 लाख रुपयांच्या मंजूरी कामांचे व जुन्या एकुण नऊ बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामांचे उद्धघाटन शिवामृत दूध संघाचे चेअरमन मा.श्री धैर्यशील मोहिते-पाटील व माजी सभापती मा.श्री संग्रामसिंह जहागिरदार यांच्या शुभहस्ते करण्याचे योजले होते.सदरच्या कार्यक्रमाची बातमी कव्हर करण्यासाठी पिलीव येथील पत्रकार प्रमोद भैस हे कार्यक्रमास्थळी गेले असता त्या ठिकाणी त्यांची 60 हजार रुपये किमतीची दिड तोळ्याची सोन्याची अंगठी बोटातून निसटून पडली होती.परंतु त्या वेळी त्यांच्या लक्षात आले नाही.कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पिलीव येथे आले असता भैस यांच्या लक्षात आले कि आपली अंगठी कुठेतरी गहाळ झाली आहे.त्यानंतर त्यांनी लागलीच सुळेवाडी गावचे माजी उपसरपंच दुर्योधन सोलंकर यांच्याशी संपर्क करुन कार्यक्रमास्थळी धाव घेतली व अंगठी शोधण्यास सुरवात केली.यावेळी सदर ठिकाणी उपस्थित असलेले सहाय्यक कृषी अधिकारी यू.एस मोहीते व नितीन शिंदे यांनी अम्हांला अंगठी सापडली असल्याचे भैस यांना सांगितले व त्यांनी ती अंगठी पत्रकार प्रमोद भैस यांच्या स्वाधीन केली.यावेळी दुर्योधन सोलंकर,दत्तु खुर्द व रामचंद्र बंडगर उपस्थित होते.एकुण 60 हजार रुपये किंमतीची हरवलेली अंगठी परत मिळाल्याने प्रमोद भैस यांनी वरील दोन्ही कृषी सहाय्यकांचे अभार मानले व या धावपळीच्या युगात अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे भैस यांनी माळशिरस टाईम्सशी बोलून दाखविले.