अक्षय चंदनशिवे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करून सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी इंदापूर पोलिस स्टेशनवर हजारोंचा मोर्चा..!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील अकलुज येथील तडीपार असणार्या गुंडांनी सराटी नजीक केलेल्या हल्ल्यात अक्षय चंदनशिवे याचा मृत्यू झाला होता.त्या हल्ल्यातील सर्व अरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन सीबीआय चौकशी व्हावी.या मागणीसाठी आज मांगळवार दि.25 फेब्रुवारी रोजी इंदापूर पोलिस स्टेशनवर बौध्द व इतर समाजातील हजारो समाजबांधवांनी मोर्चा काढला होता.अक्षय चंदनशिवे हा बौध्द समाजातील एक नामांकित पहेलवान होता. त्यामुळे बौध्द समाजासह इतरांनाही त्याचा गर्व होता. त्याने इतरत्र कोठेही लक्ष न देता फक्त आपल्या तब्येतीकडे व महाविद्यालयीन शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करून एक नामांकित बिल्डर व प्रोफेशनल जीम ट्रेनर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. तो सरळमार्गी असताना तो केवळ त्याचा मित्र आदर्श गायकवाड याच्याबरोबर फिरत होता व आरोपींचा आदर्शवर राग असल्यामुळे विविध गुन्ह्यांखाली सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या आण्णा कोळेकर, तुषार काटे व त्यांच्या इतर साथीदारांनी अक्षय चंदनशिवे याच्यावर सराटी येथे प्राणघातक हल्ला करून त्यास जीवे मारले. सदरचे आरोपी हे खंडणीबहाद्दर, वाळू माफिया व सुपारी घेऊन गुन्हे करणारे संघटीत गुन्हेगार आहेत, तसेच मोठमोठ्या टोळीतील संघटीत गुन्हेगारांशी त्यांचे जवळचे व आपुलकीचे संबंध असल्याचे त्यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांतून ते कायम दाखवून देतात.

आताही तडीपार असताना केवळ पुणे व सोलापूर जिल्हा परिसरात त्यांच्या संघटीत टोळीची दहशत कायम रहावी किंवा त्यापेक्षा जास्तच वाढावी म्हणून त्यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केले आहे. म्हणूनच आम्ही आमच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अशी विनंतीपूर्वक मागणी करतो की, या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई झालीच पाहिजे. तसेच या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच सदरच्या आरोपींनी ते हद्दपार असतानाही पोलिस कर्मचारी प्रशांत सूर्यवंशी यांचा सराटीच्या पूलावर वाढदिवस साजरा केल्याने या प्रकरणासंदर्भात प्रशांत सूर्यवंशी यांचीही चौकशी व्हावी. अक्षय चंदनशिवे याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर तो याबाबत फिर्याद देण्यासाठी अकलूज पोलिस स्टेशनला सायंकाळी ५ वा. च्या दरम्यान गेला होता. परंतु त्यावेळी अकलूज पोलिसांनी त्याची फिर्याद न घेता त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पाठविले. या उपचारादरम्यान डोक्याला टाके घेतल्यानंतर अक्षय चंदनशिवे रात्री २ वाजेपर्यंत पोलिसांची जबाबासाठी वाट पहात होता. तरीही अकलूज पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी त्याचा जबाब घेण्यासाठी हॉस्पिटमध्ये आले नाहीत. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी याबाबत चौकशी करून त्यांचेवर योग्य ती कारवाई करा.अशाप्रकारे वरील सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी होण्याबरोबरच फिर्यादी व साक्षीदार यांचे सीआरपीसी १६४ चे जबाब घ्यावेत, दाखल फिर्यादीत महादेव दिगंबर थोरात व सागर सोमनाथ सातपुते यांची नावे दाखल करावीत, पुणे जिल्हाधिकारी व पुणे पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी व कुटुंबियांना भेट द्यावी, आरोपींकडून कोणताही अनुचित प्रकार घडविला जाऊ नये म्हणून फिर्यादी व साक्षीदार यांना पोलिस संरक्षण द्यावे. सबब आपण आतापर्यंत याप्रकरणाची तात्काळ दखल घेत योग्य पध्दतीने तपास करीत आहात. सदर तपासात आम्हीही पूर्ण सहकार्य करण्याच्या भूमिकेने आपल्यासोबत आहोत. आम्ही आपणांवर पूर्णपणे विश्वास ठेवत सदरच्या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याबरोबरच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व इतर मागण्याही मार्गी लावाव्यात अशा आशयाचे निवेदन अकलुज येथील बौध्द व इतर समाज बांधवांच्यावतीने इंदापूरचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.