टेंभुर्णी येथील सागर राजगुरु यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर आजपासून सहकुटुंब आमरण उपोषण सुरु…!

टेंभुर्णी/प्रतिनिधी
टेंभुर्णी येथील जनता विद्यालयामध्ये अनुकंपा तत्वावर सागर भागवत राजगुरु यांची गेली ११ वर्षांपासून नियुक्ती न केल्याने, तसेच जातीय भेदभाव, जातीयद्वेष, जातीवाद करून एका अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला ११ वर्षांपासून त्याचे हक्कापासून वंचित ठेवल्याने २००८ ते २०२० पर्यंतच्या शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी व जनता विद्यालयाचे मुख्याध्यापकांवरती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सागर राजगुरु सहकुटुंब विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांचे कार्यालयासमोर आज मंगळवार दि.25 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसले आहेत.
             शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी व मुख्याध्यापक जनता विद्यालय यांनी मला कामावर रुजु करून घेण्याचे पत्र शिक्षणाधिकारी (माध्य) सोलापूर, शिक्षण संचालक (महाराष्ट्र राज्य), शिक्षण उपसंचालक (पुणे विभाग), शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षणमंत्री (मंत्रालय) यांनी देऊन देखील जनता विद्यालयाने वरिष्ठांचे आदेश डावलले आहेत. २००८ पासून माझी अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश असताना देखील मी मागासवर्गीय असल्याने मला डावलून २०१३ साली खुल्या प्रवर्गातील व्यक्तीचे नियुक्तीचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांना पाठविला आहे. परंतु अनुकंपा तत्वावर माझ्या नियुक्तीचा प्रस्ताव न पाठवल्याने शिक्षणाधिकारी सोलापूर यांनी खुल्या प्रवर्गातील व्यक्तीचे जनता विद्यालयाने 2013 मध्ये पाठवलेले प्रस्ताव आजतगायत मंजूर केलेले नाहीत. यावरून जनता विद्यालयाचा खोटारडेपणा समोर आल्याचे राजगुरु यांनी म्हटले आहे.


         २०१५ साली शिक्षणाधिकारी यांनी जनता विद्यालयाला पत्र पाठवून सूचित केले होते की, एका दलित व्यक्तीला जाणून बुजून आपण त्याचे हक्कापासून वंचित ठेवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या एका पत्रामध्ये शिक्षणाधिकारी यांनी सूचित केले आहे की, आपल्या शाळेत एससी प्रवर्गातील जागा रिक्त असून तातडीने राजगुरू यांची त्याठिकाणी नेमणूक करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी जनता विद्यालयाला दिले होते. परंतु गेली ११ वर्षांपासून जनता विद्यालयाने वरिष्ठांचे आदेश असताना माझा हक्क असताना, त्या जागेवर शासन निर्णयानुसार माझा अधिकार असताना देखील फक्त आणि फक्त मी मागासवर्गीय असल्याने माझा प्रस्ताव न पाठवता, एका खुल्या प्रवर्गातील व्यक्तीचा प्रस्ताव पाठवून जातीवाद करून मला माझ्या हक्कापासून वंचित ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


           जनता विद्यालय व शिक्षण प्रसारक मंडळ, टेंभुर्णीचे विश्वस्तांचा मनमानी कारभार सुरु आहे. या सर्व विश्वस्तांचे नातेवाईकांची नेमणूक करण्यात आलेली आहे व काही विश्वस्तांचे नातेवाईकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. टेंभुर्णी गावातील सुशिक्षित बेरोजगार पात्र उमेदवारांचा जनता विद्यालयाने कधीच विचार केलेला नाही. जनता विद्यालयामध्ये कमिटीमधील सदस्यांची, पत्नी, भाऊ, पुतण्या, भाचा, चेअरमनचा मुलगा, पुतण्या, शेतातील गडी व कमी पडल्यावर जवळचे नातेवाईकांना बोलावून कामावर रुजु करून घेतले आहे. अशा प्रकारची भरती करण्यात आली आहे. परंतु माझा अधिकार असून देखील मला जातीवाद करून डावलण्यात आले आहे असे राजगुरु यांचे म्हणणे आहे.
          सर्व कागदपत्रांचे पुरावे सहित गेली ३ महिन्यांपासून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी टेंभुर्णी पोलिसांना केली आहे. मात्र राजकीय हस्तक्षेप व राजकीय दबावामुळे टेंभुर्णी पोलिसांनी मला न्याय न दिल्याने सदरचे उपोषण करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने १० फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्णयाचा टेंभुर्णी पोलिसांनी अवमान केलेला आहे. उपोषण करुन देखील मला न्याय न मिळाल्यास सुप्रीम कोर्टात, सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाचे विरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. सदरची तक्रार मोघम दिलेली नसून ६१ पानी शासकीय पुरावे जोडून दिलेली आहे. माझ्या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A), वंचित बहुजन आघाडी, कैकाडी समाज युवक संघटना व भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटना (महाराष्ट्र राज्य) यांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे सागर राजगुरु यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *