वाचा चांदापुरीच्या शिवाजी गोरवेचा कारनामा : तरुणीची केली फसवणूक…!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील चांदापूरी येथील शिवाजी ज्ञानू गोरवे (वय 30) सध्या राहणार खरसुंडी ता.आटपाडी (सिद्धनाथ हायस्कूल समोर) याने पहिले लग्न झाले असताना एका तरुणीची फसवणूक करून तिच्याशी दुसरे लग्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी संगिता (काल्पनिक नाव) शिवाजी गोरवे (वय 22) राहणार खरसुंडी ता.आटपाडी,जि.सांगली यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की संगिता यांना लग्न जमवताना अरुण पारसे (वय 30) रा.कोंडी ता.उत्तर सोलापूर व दाजी केंगार (वय 35) रा.चोपडी ता.सांगोला यांनी शिवाजी गोरवे सिव्हिल इंजिनिअर असून अविवाहित असल्याचे सांगितले होते.त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019 रोजी संगिताचा विवाह रितीरिवाजाप्रमाणे शिवाजी गोरवे यांच्याबरोबर लावून दिला.त्यानंतर संगिता ही थोडे दिवस माहेरी राहून पुन्हा पतीकडे गेली.तेव्हा संगिताचा पती शिवाजी हा तिला त्रास देऊ लागला.तसेच त्याचे वागणे हे चांगले नव्हते तो वेळोवेळी पुरुषांना घरी घेऊन यायचा व त्यांच्यासमोर संगिताच्या मनाला त्रास होईल असे वागायचा.बऱ्याच वेळा संगिताने तिचा पती हा फोनवर संगिताला विकण्याच्या गोष्टी करताना तिने ऐकले होते.त्यामुळे संगिता ही पुन्हा 14 डिसेंबर रोजी माहेरी आईसोबत राहू लागली.त्यानंतर काही दिवसातच शिवाजीच्या पहिल्या पत्नीला या सर्व प्रकरणाची कुणकुण लागली व तिने संगिता व संगिताच्या भावाला सांगितले की शिवाजी हा माझा पती आहे.त्याचे काही वर्षापूर्वी माझ्याशी लग्न झाले आहे.तसेच तिने तिचे आणि शिवाजीचे लग्नातील फोटो दाखवले.शिवाजी याने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवले आणि संगिताच्या वडिलांकडून 51 हजार रुपये हुंडा घेऊन फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे.यावरून अरुण पारसे,दाजी केंगार आणि संगिताचा पती शिवाजी गोरवे अशा तिघांविरुद्ध आटपाडी पोलिसांत गुन्हां दाखल झाला असून हा गुन्हां आटपाडी पोलीस ठाण्याकडून सांगली येथे वर्ग करण्यात आला आहे.शिवाजी गोरवे याच्या भामटेपणामुळे एका तरुणीच्या आयुष्याला कलंक लागल्याने चांदापुरीसह परिसरातील ग्रामस्थांकडून शिवाजी गोरवे याच्या विरुध्द तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *