आता माती आणि पाणी वाचवायचे शिक्षण द्यायला हवे – पोपटराव पवार

सातारा /प्रतिनिधी
१९५२ चा दुष्काळ फार मोठा होता.राजकपूरच्या ‘जागते रहो’ या चित्रपटात दुष्काळात सुद्धा माणुसकी असणारी गावे आपल्याला दिसतात ,पण शहरात मात्र साधे पाणी कुणी देत नाही असे दृश्य दाखवले होते .माणसाची प्रगती इलेक्ट्रिक पासून ते रोबोट पर्यंत झाली पण आज ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न मोठा झाला आहे .पाणीच राहिले नाही तर जीवन राहणार नाही ,माणसाचे अस्तित्व राहणार नाही .स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा पाणी भरपूर होते ,आज आन्ध्र आणि तेलंग इथे जाल १६०० फुटावर पाणी लागते .महाबळेश्वरला भरपूर पाउस होतो ,पण मे महिन्यात पाणी मिळत नाही . जावळीच्या खोऱ्यात पूर्वी तलाव धरणे भरलेली असत ,पण आज पाणी नाही ,पाणी हाच आता आपला आत्मा असेल ,डोळ्यादेखत पाणी वाहून जाते पण माती आणि पाण्याचे नियोजन केले जात नाही. सिंगापूरच्या लोकांनी पाणी वाचवून नवा सिंगापूर तयार केला.मलेशियाला देखील तो पाणी देऊ लागला पण भारत अजूनही हे समजत नाही .या पुढच्या काळात माती आणि पाणी वाचवायचे शिक्षण आता द्यायला हवे ,असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज ,सातारा या महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ .अनिल पाटील हे होते .
मागील काळ आणि सध्याचा काळ याची तुलना करताना पद्मश्री पवार म्हणाले की ‘ तापमान बदलाचे सर्वात जास्त दुष्परिणाम भारताला भोगावे लागतील .१२ राशी आणि २७ नक्षत्राचा अभ्यास इथल्या शेतकरी समाजाचा होता.योग सुद्धा शेतीशी निगडीत होता .सण उत्सव मातीशी जोडलेले होते .नद्यांची पूजा होत होती .शंकराच्या मस्तकावर गंगा अवतरली हे पाहण्यासाठी मी गेलो ,तेंव्हा असे आढळले की मानस सरोवर हा भारताचा पाण्याचा मोठा स्त्रोत होता .चीन मधील डोक्लाम संघर्ष हा मूळ पाण्यासाठी आहे .आपल्या देशात निवडणुकीच्या राजकारणाने प्रचंड संघर्ष आहे .मतपेटीची चिंता सर्वाना आहे प्रजासत्ताक आले पण गणराज्य यायला हवे .सामाजिक आणि आर्थिक दरी कमी व्हायला हवी ,यासाठी शेतकरी आणि गाव यांनी गावांची पुनर्बांधणी करावी वननीती,जलनीती ,याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत हिवरे बझारच्या सर्वांनी पाणी व माती व्यवस्थापन केल्याचे त्यांनी सांगितले
जयंती मयंतीच्या वातावरणात आपण राहतो हे सांगताना म्हणाले की जयंती आणि पुण्यतिथी यांनी सामाजिक परिवर्तन होत नाही.आमच्या गावात एकही पुतळा नाही .आम्ही कामाला महत्व देतो .मला मिळालेला पद्मश्री हा पुरस्कार ,दोन लाख ४७ हजार ग्रामपंचायतीचा आनंद देणारा आहे .शिवाजी ,आंबेडकर ,गाडगे बाबा अवतरतील तर ते जयंतीला न जाता आमचे गावात येतील ,गट तटामुळे गाव दिशाहीन झालेली दिसतात .पाणी ,पीक नियोजन ,पर्यावरण याकडे लक्ष द्यावे लागेल .आमच्या लहानपणी मुलीना आम्ही घरी सुखरूप पोहचवत असू,आज मुली सुरक्षित नाहीत .संस्कार देणाऱ्या शिक्षणाची व्यवस्था निर्माण करावीच लागेल.कायदे कितीही कठोर असले तरी शिक्षणाचे कितीही डोलारे उभे केले तरी संस्काराची भाषाच देशाला करावी लागेल असेही ते म्हणाले .
शहर व ग्रामीण व्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले की शहराची सामावून घेण्याची क्षमता संपली .शहराचे आउटलेट बंद झाले .त्याने पूर आले. चीन ,पाकिस्तान ,भारत यांनी शत्रुत्वाची भावना न ठेवता राष्ट्रहिताच्या गोष्टी करायला हव्या आहेत .गावाकडे लक्ष देणारी तरुणाई हवी आहे .योजनांचे आलेले पैसे प्रामाणिकपणे खर्च केले पाहिजेत .संत तुकारामांनी दुष्काळच्या काळात कर्जे माफ केली .आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा विचार दिला.झाडे वाढवली पाहिजेत .पण आम्ही संताना देखील मत पेट्यात बंदिस्त केले .मला असंघटीत वर्गाची जास्त काळजी आहे .या पुढच्या काळात पैसा खूप असणारास श्रीमंत मानले जाणार नाही .ज्याकडे निरोगी मूल असेल तो भाग्यवान असेल.पंजाब देशाला जगवत होता आज त्यांचे पाणी ४०० फुट खाली गेले .कन्सर ,डायबेटीस ,रोग वाढलेत ,कोल्हापूर ,हात कानन्गले कन्सर वाढत आहेत .या पुढच्या काळात सोन्याने भरलेल्या हंड्याला लोक विचारणार नाहीत पण पाण्याने भरलेल्या हंड्याला खूप महत्व येईल .पाणी व्यवस्थापन हे सर्वात मोठे चलेंज आहे असे ते म्हणाले .
अध्यक्षीय मनोगतात डॉ .अनिल पाटील म्हणाले की ‘ छ .शिवाजी कॉलेज हे अण्णांच्या स्वप्नातले कॉलेज आहे ,१९२८ ला अण्णांनी स्वप्न पाहिले होते की शिवाजी कॉलेज ,अकबर कॉलेज व महादजी शिंदे कॉलेज स्थापन करायचे .शिवाजी कॉलेज हे अतिशय भाग्यवान कॉलेज आहे .रयत शिक्षण संस्थेचे फ्री आणि रेसिडेन्शियल कॉलेज होते .१९४७ ला १७ मुले होती ,दुसऱ्या वर्षी १८ झाली. लेबर स्कीम हा कॉलेजचा आत्मा आहे .माहुली येथील पडक्या इमारतीत देखील मुले राहून जिद्दीने शिक्षण घेत होती .येणाऱ्या काळात आर्टसला खूप आव्हाने आहेत .प्रत्येक मुलीने या ५ वर्षाच्या काळात नोकरी मिळवली पाहिजे ,कौशल्य घेतले पाहिजे ..पुढच्या काळात ७१ टक्के काम मशीन करणार आहे . आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आहे .पण माणसाची कला जे करू शकते ते तंत्रज्ञान करणार नाही ,मानवी मेंदू सर्वोच्च आहे .आपल्या कल्पना व बुद्धीने नव्या युगात भाषांतर, अनुवाद ,जी मॅट.इंटरप्रीटेशन ,इत्यादी गोष्टी शिकून करिअर केले पाहिजे असे ते म्हणाले .
प्रारंभी रयतगीत गायन झाले .प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .भाऊसाहेब कराळे यांनी केले .प्रा.विक्रमसिंह ननावरे यांनी जिमखाना अहवाल वाचन केले .पीएच,डी झालेल्या प्राध्यापकांचा ,गुणवंत खेळाडूंचा ,महाविद्यालय विकास समितीवर निवड झालेल्या प्राध्यापकांचा ,नेट,सेट ,परीक्षा पास प्राध्यापक सेवकांचा ,बेस्ट रीडर ,गुणवंत प्राध्यापक ,गुणवंत पालक ,आर्मी मध्ये भरती झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा व प्रोफेसर झालेल्या प्राध्यापकांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.अभिमन्यू निमसे व प्रा .साधना पाटील यांनी केले उपप्राचार्य.डॉ.अनिसा मुजावर यांनी आभार मानले.या कार्यक्रमास ज्युनिअर विभाग उपप्राचार्य प्रा संजय महाडिक ,महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा .डॉ .एस .बी .झोडगे.प्रा.डॉ सुभाष कारंडे प्रा.डॉ.अनिल वावरे , विविध विभागांचे प्रमुख , जिमखाना विभागाचे प्रा .अरुण पाटील ,.महाविद्यालयीन विकास समिती सदस्य ,प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *