स्व.अजितसिंह जहागिरदार यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त पिलीवसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने विनम्र अभिवादन…!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावचे जेष्ठ नेते स्वर्गीय अजितसिंह बाळासाहेब जहागिरदार यांच्या द्वितीय पुण्यतिथी निम्मित पिलीवसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने आदरांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रारंभी माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार व समरजितसिंह जहागिरदार यांनी स्व.अजितसिंह जहागिरदार यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे यांनी अजितसिंह जहागिरदार हे माजी सैनिक असल्याने स्वयंशिस्त पाळणारे,वक्तशीरपणा जपणारे स्पष्ट वक्ते व सडेतोड बोलणारे तालुक्यातील रुबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते असे सांगितले.त्यांनी भारतीय सैन्यात काही काळ सेवा बजावली असून पिलीव गावचे सरपंच पद,माळशिरस पंचायत समितीचे सदस्य,माळशिरस तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, सहकार महर्षि कारखान्याचे संचालक, शिवामृत दूध संघाचे उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कापूस एकाधिकार योजनेचे संचालक म्हणून आपल्या शिस्तप्रियतेच्या जोरावर राज्य पातळीवर हि व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवून त्यांनी कायम समानतेचे,माणसे जोडण्याचे व बेरजेचे राजकारण केले असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील म्हणाले कि विकासाची दृष्टी लाभलेले दूर दृष्टीचे नेते म्हणून स्वर्गीय अजितसिंह जहागिरदार यांची ओळख होती.गावाच्या व तालुक्याच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान होते त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य आपण सर्वांनी पुढे घेवून जाणे हिच खरी आपली श्रद्धांजली ठरेल.यावेळी प्रा.संतोष शेंडगे,रघुनाथ देवकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर स्वर्गीय अजितसिंह जहागिरदार हे सर्वसामान्यांना आधार वाटायचे त्यांच्या आपुलकीच्या भावनेने सर्वसामान्यांची कामे होत होती.

स्वर्गीय अजितसिंह जहागीरदार (दादासाहेब) आमच्यासह जहागिरदार कुटुंबियाचे आधारस्तंभ होते दर वर्षी येणाऱ्या त्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमावरील अनावश्यक खर्च टाळून त्यांच्या स्मरनार्थ सर्व समावेशक समिती स्थापून या पंचक्रोशीतील गरीब ,गरजू ,अपंग ,निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व कल्याणासाठी निधी उभा करून त्यांना मदत करण्याचा मानस माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांनी या प्रसंगी व्यक्त केला.या पुण्यतिथी निमित्त परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच,सदस्य,विविध सहकारी संस्था, सामाजिक संघटना व राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी पंचायत समितीच्या सदस्या ताई महाडिक,बाळासाहेब जावळे,डॉ.दिलीप पवार,बाबुराव पाटील,मारुती देशमुख, उपसरपंच सौ, शमशाद काझी,ग्रामपंचायत सदस्य संजय आर्वे,अविनाश जेऊरकर,दादा देशमुख, दत्ता बोडरे ,चंद्रकांत पिसे ,सुषमाताई जामदार,सोनाली करमाळकर ,ज्योती फाळके,शिंगोर्णीचे उपसरपंच डॉ.गजानन कदम,बाबुराव कदम,रामचंद्र कोळी, विजयसिंग राजपूत, रणधीरसिंह जामदार,प्रमोद भैस ,शिवाजी सावळजकर ,समशेरसिंग राजपूत,मोहसीन शेख,नानासाहेब मदने,दत्ता खटावकर व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *