अकलूजमधील ‘मे. अभिनव स्नॅक्स’चा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अन्न व औषध प्रशासना’ची धडक कारवाई

पिलीव/सुजित सातपुते

गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील एका नामांकित स्नॅक्स सेंटरवर कारवाई करण्यात आली असून तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याने सदर आस्थापनेचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे कडक निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
गणेशोत्सव व आगामी सणांच्या दिवसांत बाजारात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थ विकले जाऊन ग्राहकांच्या आरोग्यास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दुकानांमधील अन्नपदार्थांची साठवणूक, परिसरातील स्वच्छता, अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल, रंग व इतर घटकांच्या गुणवत्तेची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे यांनी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील बायपास रोड, जयसिंग चौक येथे स्थित असलेल्या ‘मे. अभिनव स्नॅक्स’ या पेढीची प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीदरम्यान अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले तसेच दुकानात अनेक त्रुटी आढळून आल्या. या त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या दुकानातील व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. सा. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री.डॉ.मंगेश लवटे यांनी पार पाडली.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून येत्या काळात अन्न आस्थापनांची अशीच कडक तपासणी सुरूच राहणार आहे. सणासुदीच्या काळात सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांमधील सर्व नियमांचे व मानकांचे काटेकोर पालन करावे; तपासणीवेळी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सहाय्यक आयुक्त श्री. सा. ए. देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *