शिंगोर्णी येथील प्राचीन काळातील शंभू महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी “शहाजी (शेठ) महाडीक” यांनी स्वखर्चाने केला रस्ता : शिव भक्तांनी मानले आभार..!
पिलीव/सुजित सातपुते
श्रावण महिना हा शंभू महादेवाला खूपच प्रिय आहे असा समज आपल्याकडे आहे.आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या उपवासांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असाही समज आहे.त्यामुळे या काळात महादेवाची पूजा ही फलदायी ठरते असे समजण्यात येते.महादेवाची पूजाअर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं.तसंच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात असाही समज आहे.

सर्वत्र आनंद,उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि म्हणूनच याला अनन्यसाधारण असे महत्व आहे.याच अनुषंगाने आपल्याही गावातील महीलांना व परुषांना शंभू महादेवाची पूजाअर्चा करण्यास मिळावी,त्यांच्याही इच्छा आकांक्षा पुर्ण व्हाव्यात,श्रावण महीन्याचा त्यांनाही आनंद घेता यावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी गावातील शिवभक्त शहाजी महाडीक यांनी साडे तीनशे वर्षापूर्वीचे म्हणजेच पुरातन काळातील असणार्या महादेवाच्या मंदीराकडे जाण्यासाठी स्वखर्चाने गावकर्यांना रस्ता करुन दिला आहे.शिंगोर्णी गावामध्ये हे एकच महादेवाचे मंदीर आहे.परंतू परिसरातील सर्वात उंच अशा डोंगरावर हे मंदिर असल्याने कोणीही जात नव्हते किंवा जाता येत नव्हते.हिच अडचण लक्षात घेवून महाडीक यांनी चार ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने हा रस्ता केला.रस्ता केल्याचे समजताच भाविक भक्तांची शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.इतके दिवस मंदिर होते परंतू भक्तांसाठी रस्ता करुन देण्याची कोणाची दानत झाली नाही परंतू महाडीक यांनी स्वखर्चाने मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता करुन दिला त्यामुळे आमची गैरसोय दूर झाल्याचे उपस्थित शिव भक्तांकडून बोलले जात होते.यावेळी डॉ.गजानन कदम यांनी ग्रामस्थांच्या व शिव भक्तांच्यावतीने महाडीक यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देवून सन्मान करुन आभार मानले.
आपल्या गावातील ग्रामस्थांना वर्षातील प्रत्येक सणाचा आनंद घेण्यात यावा.असे मला वाटते त्याच हेतूने पहीला प्रयत्न म्हणून हे रस्त्याचे काम केले.
“शहाजी (शेठ) महाडीक”